पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


अपंगांच्या पुनर्वसन कार्याची दशा व दिश


 अपंगांच्या पुनर्वसन कार्याची आजची दशा (खरं तर दुर्दशा ?) पाहता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की असे पुनर्वसन कार्य करणारी शासनयंत्रणा, स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांना या कार्याची खरी दिशाच समजलेली नाही. ती समजावून घेणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. माणसास येणारे अपंगत्व अनेक प्रकारचे असते - शारीरिक, मानसिक, सामाजिक, अपंगत्वनिहाय पुनर्वसनाची दिशा व कार्यपद्धती भिन्न असते. या लेखात प्रामुख्याने शारीरिक अपंगांच्या पुनर्वसनाची दशा व दिशेचे चित्रण करण्याचे मर्यादित उद्दिष्ट निश्चित केल्याने या लेखाची स्वत:ची अशी एक मर्यादा आहे खरी.
 शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्ती दुर्दैव व क्रूरतेचे बळी असतात. सामाजिक उपेक्षा व दयेची शिकार झालेल्या अशा व्यक्तींचा विजनवास हा प्रत्येक संवेदनशील मनुष्यास अस्वस्थ करणारा ठरत असतो. अपंग दु:खद, उपेक्षित व निराशाजनक जीवन जगत असतात. या जगण्यास त्यांच्या वाट्याला आलेले अपंगत्व हे अंशत: कारणीभूत असते. पण त्याचे खरे कारण समाजाकडून त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक असते. अनादि कालापासून त्यांना नगण्य, अक्षम, अकार्यक्षम व अज्ञानी मानण्यात येत असले, तरी वस्तुस्थिती तशी नसते. त्यांना जे जगणे भाग पडते, ते त्यांच्यावर समाजाने लादलेले असते. अपंग माणसे ‘समाजाची सुप्त कौशल्य शक्ती असून त्यांच्या कौशल्य, शक्ती ज्ञानाचा वापर समाज विकासात होऊन शकतो; जर त्यांचे पुनर्वसन योग्य दिशेने झाले, तर ते प्रतिष्ठित नागरिकही होऊ शकतील. अपंगांच्या ज्ञान व कौशल्याची समाजाद्वारा उपेक्षा झाल्याने समाजाच्या फार मोठ्या सुप्त शक्ती व कौशल्याचा अनुपयोगामुळे अपव्यय झाल्यासारखीच स्थिती आहे. परिणामी, हे अपंग आज निष्क्रिय, नीरस, निराशापूर्ण जीवन जगत आहेत.

वंचित विकास जग आणि आपण/७१