पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

योग्यच आहे. पण या देशात संघटितरीत्या हक्कांची लढाई लढल्याशिवाय काही मिळत नाही, हा इतिहास दृष्टिआड करून चालणार नाही. प्रतिनिधित्वाचा उपयोग ज्येष्ठांचे जीवन बदलण्यास नक्कीच होईल व त्यासाठी नुसते आग्रही नाही तर आक्रमक होण्याची गरज आहे.
 प्रश्न ९ : समाज स्वास्थ्यासाठी ‘वृद्धाश्रम'ची नितांत आवश्यकता आहे असे म्हटले जाते, यासंबंधी आपले काय विचार आहेत?
 उत्तर : समाजात सर्वांनाच अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, उपचार मिळतो असे नाही. अशा वर्गासाठी वृद्धाश्रम हवाच. तो सामाजिक स्वास्थ्याचा अविभाज्य भाग आहे. पण, ही व्यवस्था मूलतः कुटुंबाने दिली पाहिजे. शासनाची भूमिका साहाय्याची व पर्यायी व्यवस्था म्हणून अपवाद वंचितांसाठी राहायला हवी. सुखवस्तू कुटुंबातील वृद्धाश्रमात जाणे, राहणे हा कुटुंब कर्तव्याचा पराभव होय.
 प्रश्न १0 : ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या ठोस उपायाची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
 उत्तर : आपल्या देशात शासकीय, निमशासकीय निवृत्ती वेतन धारक, कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक वगळता उर्वरीत असंघटित, खासगी नोकर, कामगार, मजूर, शेतमजूर व सर्वसामान्य दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक यांची सामाजिक, आर्थिक, आरोग्य, सुरक्षाविषयक स्थिती मानव अधिकारांची अक्षम्य पायमल्ली करणारी आहे.
 त्यासाठी खालील ठोस पावले उचलणे अनिवार्य आहे -
 १. ज्येष्ठांविषयीचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील धोरण निश्चित काळात जाहीर करणे.
 २. सर्व ज्येष्ठांसाठी सामाजिक सुरक्षा योजना व निर्वाहभत्ता लागू करणे.
 ३. ज्येष्ठांना दिल्या जाणा-या सुविधांचा सार्वत्रिक विकास करणे.
 ४. ज्येष्ठांचे हक्क जाहीर करणे.
 ५. ज्येष्ठ नागरिक संघटनांचे उद्देश, धोरण कार्यपद्धतीबाबत एकवाक्यता निर्माण करणे.
 प्रश्न ११. ज्येष्ठ नागरिकांना समाजात आदराचे व सन्मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी खालील संस्थांनी काय करावे, असे आपल्याला वाटते?

वंचित विकास जग आणि आपण/६४