पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


ज्येष्ठ नागरिक संघ : स्वरूप, प्रश्न व कार्य


 महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) संशोधन, विस्तार व विकास समिती सर्वेक्षण प्रकल्प : वृद्धासंबंधी प्रश्नांना माझी उत्तरे
 प्रश्न १ : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व प्रश्न यांच्याशी आपला संबंध कसा व केव्हा आला? या प्रश्नावर काही कार्य वा विचार करावा असे आपणास का वाटते?
 उत्तर : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्न व समस्यांशी माझा संबंध माझ्या कळत्या वयापासून आहे. मी ज्या अनाथाश्रमात जन्मलो, वाढला, त्या वा. बा. नवरंगे बालकाश्रम, पंढरपूर, जि. सोलापूर येथे महिलांचे आधारगृह (रेस्क्यू होम) चालवले जायचे. त्या वेळी स्वतंत्र वृद्धाश्रमाची कल्पना रूढ नव्हती. वृद्ध, परित्यक्ता, कुमारीमाता, विधवा, निराश्रित, प्रौढ स्त्रिया आदींचा एकत्र सांभाळ केला जायचा. तिथे वृद्ध निराश्रिता मी बालपणापासून पाहात आलो होतो. कळत्या वयात त्यांचे प्रश्न व समस्या कळत. मन विकल होत होते. तेव्हा केवळ जाणीव झाली. पुढे मी सामाजिक कार्य वयाच्या २१ व्या वर्षांपासून करू लागलो. ३0 व्या वर्षी त्याला पूर्णवेळेचं रूप आलं. तेव्हापासून वृद्धांविषयी काही करावे असे वाटत आले नि करतही आलो.
 प्रश्न २ : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर ज्यावेळी आपण चिंतन करण्यास सुरुवात केली, त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक स्थिती कशी होती, त्या तुलनेत आजची स्थिती कशी आहे, असे आपणास वाटते?
 उत्तर : हा काळ वर म्हटल्याप्रमाणे सन १९७०-७१ चा होता. त्यावेळी ज्येष्ठांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन भिन्न होता. शासन स्तरावर या वर्गासाठी काही केले पाहिजे अशी चर्चा, विचार सुरू होता. समाजात काही संस्थांनी भारतात सेवा कार्य सुरू केले होते. भारतातला पहिला वृद्धाश्रम सन

वंचित विकास जग आणि आपण/६१