पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

असते. त्या काळात तिथलं सरकार घोड्याला व घोडेवानाला सहा महिने बेकारीचा निर्वाह भत्ता देते. जो देश प्राण्यांनाही पेन्शन देतो, तो अपंगांना किती सुविधा देत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
 युरोपमधील सर्व देश मुलांना राष्ट्रीय संपत्ती मानतात. प्रत्येक अपंग बालकाच्या संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाची जबाबदारी राष्ट्राची. अशा मुलांच्या पालकांना ते देश जन्मापासून ते पुनर्वसनापर्यंत अनेक प्रकारे साहाय्यता देतात. मदतीची मर्यादा नसते. गरजेप्रमाणे साहाय्य हे तिथल्या योजनांचे वैशिष्ट्य! शिवाय मदत वेळेवर देण्याचा कटाक्ष असतो. पालक, शिक्षक, नागरिक, अधिकारी प्रत्येक जण आपापल्या पातळीवर तत्परता दाखवतात. त्यामुळे अपंगांची उमेद वाढते. जे दिले जाते ते सन्मानाने, प्रदर्शन न करता. हे पाहिलं जातं की मदत आपोआप झाली पाहिजे.
 नेदरलँडची राजधानी असलेल्या अॅमस्टरडॅम शहरात मी फिरत होतो. पाहिले की इथे वृद्धांसाठी रस्ते आरक्षित आहेत. अपघातात अपंगास इजा झाली तर डोळसास अपराधी मानले जाते. त्यामुळे इथे अपंगाच्या केसास धक्का लागत नाही. या सर्वांतून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की युरोपातील अपंग सहाय्यता ही दया केंद्रित नाही. ती अधिकार केंद्रित आहे. शिवाय त्यामागे कर्तव्यभावनाही आढळते. मानसिक परावलंबन राह नये म्हणून हे देश भरपूर विचार करतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथील अपंग संघटन, संस्था सर्वसाधारण समाजाच्या कल्याणाचे कार्य करतात. सार्वजनिक सण, समारंभ, उत्सव, क्रीडा, संगीत कार्यक्रमात अपंगांचा सहभाग उत्साही असतो.
 युरोपच्या या उदाहरणांवरून शिकून आपण जर अनुकरण करू तर आपल्या देशातील अपंगही मानसिकदृष्ट्या पुनर्वसित, स्वावलंबी होतील. त्यासाठी आपण त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्याबद्दलची दृष्टी व कृती बदलायला हवी. त्यासाठी आपल्या शिक्षणात अपंगांप्रती भावसाक्षरता असायला हवी. स्वातंत्र्याच्या सहा दशकांच्या प्रवासानंतरही आपणाकडे कुबड्या, व्हीलचेअर्स, पांढरी काठी, श्रवणयंत्रे, जयपूर फूट वाटताना पाहतो. तेव्हा अस्वस्थ होतो. हे मान्य आहे की, ती या क्षणाची गरज आहे. पण, परावलंबन करणारं सहाय्य केव्हापासून आपण देत राहणार? की, स्वावलंबनास प्रोत्साहन देणार? एकविसावं शतक सुरू झालंय. या काळात तरी आपण नवी दृष्टी घेणार की नाही? उपचार, उपकरणे हवीत पण संधी व समुपदेशनही तितकंच महत्त्वाचं! या तर अपंग बंधू-भगिनींनो! आपणच आपले हात हातात घेऊ, मानसिक परावलंबन झुगारू. आपण स्वबळावर कोणी तरी होऊन दाखवू.

वंचित विकास जग आणि आपण/६०