पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 विदेशात जाण्यापूर्वी भारतात वरील सर्व वंचितांचे कार्य जगात कसे सुरू झाले, भारतात त्याचा प्रारंभ कसा झाला, महाराष्ट्रातच वंचित विकासाच्या कार्याची मुहर्तमेढ कशी रोवली गेली, त्याचा अभ्यास मी केलेला होता. परदेशात जाताना मी एक स्वप्न घेऊन गेलो होतो. तिथले सारे कार्य पाहायचे नि तसे इथे करायचे. माझ्या या स्वप्नाला तिथल्या प्रवासात तडा गेला. स्वप्नभंगच झाला म्हणा ना! एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. आपले येथील वंचित विकासाचे कार्य व कायदे इंग्लंडच्या धर्तीवर विकसित झाले होते; पण गेल्या ५० वर्षांत तिथे वंचित विकास कार्यात क्रांतिकारी बदल झालेले होते. संस्था विसर्जित करून इंग्लंडने संस्थाबाह्य सेवा विकसित केल्या होत्या. ते पाहून माझे डोळे खाडकन उघडले.
 वंचित विकासाच्या कामाची एक नवी दृष्टीच युरोपने मला दिली. पुढे सन १९९६ ला मी जपानला जाऊन वंचित विकास कार्याचा अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की वंचित विकासाचे कार्य, त्याबद्दलच्या आस्थेने नाही तर बांधिलकीच्या भावनेने केले तरच होते. शिवाय तेथील वंचित विकासाचे कार्य शासनाचा पैसा व स्वयंसेवी संस्थांची प्रतिबद्धता यातून साकारले आहे. या साच्यातून शिकत मी वेळोवेळी लिहीत गेलो.
 वंचित विकासाशी माझा संबंध म्हणाल तर जन्मापासूनचा. तो आजपर्यंत तसाच टिकून आहे. प्रथम लाभार्थी, नंतर कार्यकर्ता, मग पदाधिकारी, तद्नंतर राज्यस्तरीय कार्यकर्ता, पदाधिकारी, संपादक, मार्गदर्शक... अशा स्थल, कालपरत्वे भूमिका बदलत गेल्या तरी या विषयाशी माझे नाते अतूट राहिले आहे नि भविष्यातही ते राहील. कारण वंचित विकास हा माझा जन्म, जीवन, जगणे नि भविष्याचा अविभाज्य भाग आहे.
 स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन मुंबई इलाख्यात सन १८५७ मध्ये डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी' सुरू करून इथल्या वंचित विकासाची सुरुवात झाली. ब्रिटिश आमदनीत हे कार्य सुधार प्रशासनाचे असायचे. तो विभाग गृह व तुरुंग विभागाच्या अखत्यारित असायचा. नंतर त्यात सुधारणा होऊन तो मागासवर्गीय कल्याण विभागास जोडला गेला. नंतर त्या विभागाचे नामकरण 'समाजकल्याण विभाग' करण्यात आले. मी सन १९८० मध्ये काम सुरू केले तेव्हा महिला, बाल, अपंग इ. विभाग समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत होते. मागासवर्गीय व आदिवासी कल्याण विभागास झुकते माप असायचे. महिला, बाल व अपंग कल्याण योजना, संस्था, कार्यकर्ते, आर्थिक तरतूद, सुधारणा सर्वच बाबतीत सापत्नभावाची मिळणारी वागणूक लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी दशकभर महिला, बाल व अपंग विकासाचे स्वतंत्र मंत्रालय, संचालनालय, मंत्री,