पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 विदेशात यासाठी मतिमंदांच्या निवासी शाळा चालविण्याकडे भर आहे. अशा स्थितीत लैंगिक स्वावलंबन, लैंगिक परिणामांपासूनच्या सुरक्षिततेची जाण निर्माण करणे सोपे जाते. इंग्लंडमध्ये तर २१ वर्षांवरील मतिमंदांची स्वतंत्र समाज केंद्रे (युवागृहे) चालविण्यात येतात. तिथे मतिमंद युवकयुवती एकत्र राहतात. त्यांना लैंगिक प्रशिक्षण दिले जाते. ते उभयपक्षी जबाबदारी वाढविणारे असते. उदात्तीकरणावर भर असतो. प्रतिबंधात्मक उपायांची काळजी घेतली जाते. मतिमंदांनाही सामान्य माणसाप्रमाणे जगता, हसता, खेळता यावे यावर भर असतो. हॉलंडमध्ये तर ‘प्लक अँड पिक' सारखे उद्याने विकसित करण्यात आली आहेत. हगेरीत तर चक्क मतिमंदासाठी गावेच वसवली आहेत. ‘ए वन व्हिलेज' मध्ये मतिमंद मुला-मुलींचे पालक पाल्यांसह एकत्रित राहतात. तिथे समदुःखितांचे सहजीवन सुखी करण्याचा करण्यात येणारा प्रयत्न पाहिला की आपल्या लक्षात येते की अपंगांचे कोणतेही प्रश्न कप्पेबंद पद्धतीने (कंपार्टमेंटल) सुटू शकत नाहीत. त्यासाठी सर्वसमावेशक (होलेस्टिक) अशा कार्यशैलीची गरज असते. न्यूयॉर्क जवळील ‘कॅप' सेंटर याचेच उदाहरण होय. पॅरिस, टोकिओ, नारा, मेट्झ (फ्रान्स, जपान) आदी ठिकाणी मी पाहिलेली केंद्रे ही या संदर्भात अधिक संवेदनशील वाटली. विदेशात अपंग वा मतिमंदांचे ‘सामान्यीकरण' (नॉर्मलायझेशन) हे त्यांच्या अपंग शिक्षण व विकास कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असते. कळत्या वयात मुले सर्वसामान्य शाळात जाण्यावर भर दिला जातो. इथे अनाथाश्रम, रिमांडहोमसारख्या संस्थात काम करताना माझ्या हे चांगले लक्षात आले की मतिमंद मुले-मुली जर सामान्य मुला-मुलींच्या वसतिगृहातून वाढतील तर त्यांचे सामान्यीकरण जलदगतीने होऊ शकेल.
 माझी एक मानलेली समवयस्क बहीण अपंग (अस्थिव्यंग) मतिमंद होती. तिला फिट्सही यायच्या अधी-मधी. तरीही तिची लैंगिक जाण इतरांच्या जवळपास होती. (तिची बौद्धिक क्षमता लक्षात घेता.) माझी एक भाची मतिमंद अहे. पण घरातील सर्वांच्या सजग वाढीच्या प्रयत्नामुळे शाळेतील तिच्याइतक्या मतिमंद मुलीपेक्षा तिची लैंगिक जाण समाजसंमत व्यवहारास धरून आहे. अनेक संस्थातील अनुभवातूनही माझ्या असे लक्षात आले आहे की आपला मतिमंदांच्या लैंगिकतेसंबंधीचा दृष्टिकोन सजग व उदार असेल तर मतिमंद सामान्य होण्यात ते सहाय्यभूतच ठरते. षोड्शवर्षीय माझ्या मतिमंद भाचीस मी जेव्हा ‘हृतिकचे पोस्टर दिले तेव्हा तिच्या डोळ्यांतून झरणारा आनंदाचा डोह मी पाहिला आहे. तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय व तिच्या जीवनातील ‘एक मात्र मान्यताप्रसंग' होय. मुळात मतिमंदांना

वंचित विकास जग आणि आपण/५४