पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


मतिमंदांतील लैंगिकता व समाजदृष्टी


 लैंगिकता ही सजीवातील सर्वाधिक बलवान अशी प्रेरणा आहे. ती प्राणी, पक्षी, वनस्पतीत जशी असते तशी ती मनुष्यातही असते. अपंग माणसातील लैंगिकता तर सर्वसाधारण माणसांप्रमाणेच असते. मतिमंदांतील लैंगिक भावनेचाच विचार करायचा झाला तर आपणास असे दिसून येते की सामान्य माणसांप्रमाणेच ती मतिमंदात असते. लैंगिक भावना बाल्यावस्थेतही असते परंतु सौम्य, युवावस्थेत ती तीव्र असते. प्रौढावस्थेत ती सर्वाधिक तीव्र असते तर वृद्धावस्थेत ती क्षीण होत जाते. हा क्रम-तीव्रता वा क्षीणता मतिमंदात इतरेजनांप्रमाणेच विकसित होतो. लैंगिक भाव व वृत्तीचा संबंध शरीरात निर्माण होणा-या अंत:स्त्रावांशी (Hormones) संबंधित असतो. हे स्त्राव मतिमंदात आपल्याप्रमाणेच असतात व निर्माण होतात. त्यामुळे

आपल्याप्रमाणेच मतिमंदात त्यांच्या पौगंडावस्थेत शारीरिक, मानसिक, भावनिक बदल घडून येत असतात. मुलांमध्ये दाढी-मिश्या येणे, काखेत, जांघेत केस येणे, आवाज फुटणे, वीर्य निर्माण होणे, त्यांचे प्रसंगोपात पतन अथवा स्खलन होणे स्वाभाविक असते. मुलींमध्ये अंग भरून येणे, स्तनास उभारी येणे, नितंब पुष्ट होणे, मासिक पाळी वा रजोदर्शन होणे इतर मुलींप्रमाणेच होते. मतिमंदात

आपल्याप्रमाणेच सर्व लैंगिक क्रिया करण्याची इच्छा व क्षमता असते. लैंगिक व्यवहार, भावनासंबंधी हितगुज करणे, नेत्रकटाक्ष, स्पर्शाची ओढ, कामोत्तेजक भागास (ओठ, गाल, स्तन, नितंब नि खरे तर सारे शरीर) (इरोजिनिअस) स्पर्श करण्याची ओढ, कुरवाळणे, हाताळणे, दाबणे, घर्षण करणे, चुंबन घेणे, हस्तमैथुन करणे, आलिंगन देणे वा घेणे, इतकेच काय प्रत्यक्ष संभोग वा । समागमाची भावना आपल्याप्रमाणेच मतिमंदात असते. आपण ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी की आपल्याप्रमाणेच मतिमंद मुले, युवक व प्रौढांना लैंगिक सुख घेण्याचा हक्क' आहे. इतर शारीरिक अज्ञानातून वा

वंचित विकास जग आणि आपण/५0