पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


मनोगत



वंचित विकासाचे आकाश निरभ्र व्हायचे तर...




 सन १९९० चा काळ असेल. मी बालकल्याणाचं कार्य सुरू करून दशक सरत आले होते. कोल्हापूरच्या रिमांड होमचे रूपांतर मी बालकल्याण संकुलात करून तिथे एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या सर्वांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन कार्यास एक नवे परिणाम विविध प्रयोगांतून दिले होते. त्याची सविस्तर कहाणी आपणास माझ्या ‘खाली जमीन, वर आकाश' या आत्मकथनात वाचावयास मिळेल. याच काळात मी महाराष्ट्रातील अनाथाश्रम, रिमांड होम्सच्या मध्यवर्ती संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवीक्षा अनुरक्षण व अनुसरण संघटना, पुणेच्या कार्यातही सक्रिय होतो. राज्याचे धोरण, प्रश्न, योजना यात माझी भागीदारी अग्रणी असायची. याच काळात मी या राज्य त्या संस्थेचे मुखपत्र असलेल्या समाजसेवा' त्रैमासिकाचा संपादक होतो. त्या संस्थेचा उपाध्यक्षही होतो. पुढे अध्यक्षही झालो.
 अनाथ, निराधार, हरवलेली, टाकलेली, सोडलेली, घर सोडून पळून आलेली, बालगुन्हेगार, बालमजूर मुले-मुली, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, कुष्ठपीडित, तुरुंगातील बंदी बांधव व भगिनी इत्यादींची आपद्ग्रस्त अपत्ये, शिवाय बलात्कारित भगिनी, परित्यक्ता, हुंडाबळी, फसवलेल्या भगिनी या सा-यांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन, प्रशिक्षण, विवाह, दत्तकीकरण, नोकरी इ. द्वारे त्यांना परत समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याच्या ध्यासाचे ते दिवस होते. मी नुकताच युरोपमधील फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी, स्विट्झर्लंड, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम, व्हॅटिकन, लक्झेंबर्ग शिवाय आशियातील सिंगापूर, थायलंडमध्ये अशा कार्याचा तिथे दोन महिने राहून फिरून अभ्यास केलेला होता.