पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

त्यात नवशिक्षित, नोकरी करणा-या, कमावत्या स्त्रियांचा अहंकार व अधिकार भावनेने वाढलेली संख्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यास पुरेशी आहे. पूर्वी गरीबी, निरक्षरता, अंधश्रद्धा इ. मुळे वेश्या, देवदासी निर्माण होत. आता विशेषतः महानगरामध्ये बदललेल्या जीवन शैलीमुळे प्रचलित वेश्यावस्तींशिवाय स्वतंत्र, स्वगृही वा स्थलांतरीत पद्धतीने वेश्या व्यवसायाचे वाढते लोण; अल्पवयीन वेश्यांची बाजारातील वाढती मागणी, त्यामुळे अल्पवयीन वेश्या प्रमाणात वाढ यासारखे ऐरणीवरचे प्रश्न आपल्या चिंता व चिंतनाचा विषय होत नाही. त्यांच्या प्रतिबंध व नियंत्रणाचा कुठला कार्यक्रम आपण राबवतो? पोलिसांच्या धाडी या किती प्रासंगिक, दिखाऊ असतात हे लहान मुलेही सांगू शकतील. भिक्षेकरी, वेड्या, रस्ता-प्लॅटफॉर्मवरील निराधार स्त्रियांवर सर्रास होणारे बलात्कार कोणते सामाजिक अभय सिद्ध करते? एड्सग्रस्त, अपंग, बंदीजन, महिलांची काय कमी दुरवस्था आहे? ना उपचार, ना संरक्षण ना सुविधा. घरातील कत्र्या स्त्रिया जिथे जीव मुठीत घेऊन जगतात तिथे वंचित स्त्रियांचा वनवास काय वर्णावा? कुमारीमातांचे प्रमाण कमी झाले का? कामकरी, नोकरी करणाच्या शिकणाच्या स्त्रियांचे कार्यालय, कारखाने, शेतमळे, शाळा, विद्यापीठे इत्यादीमधील लैंगिक शोषण व त्रास केवळ कायदा करून कसा संपेल? यासाठी शिक्षण व समाजधारणेत लिंगभेदातीत मानवी समाज निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित व्हायला हवे. ते न झाल्याने शिक्षण विस्तार होऊनही महिलांचा वनवास कमी झाला नाही. याचे मुख्य कारण महिला वर्ग घरी व समाजात वंचितच राहिला. याचे पुरेसे भान आपणास राहिले नसल्याने ३३% आरक्षण, मोफत शिक्षण इ. सवंग घोषणांच्या व कार्यक्रमांच्या आपण नादी लागत गेलो. याशिवाय आपल्या समाजात वृद्ध, अपंग अशा वंचित पुरुषांचाही मोठा वर्ग आहे. त्यांचा स्वतंत्र वंचित घटक म्हणून विचार व्हायला हवा.

वंचितांच्या विकास कार्यक्रमांचे तोकडेपण


 सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या वरील वंचित घटकांसाठी राज्य व केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांचे जाळे विकसित करण्यास हातभार लावला आहे. त्यांच्या विकास व कल्याणाच्या विविध योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली आहे. संस्थांना अनुदान दिले आहे. शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले आहे. निर्वाह भत्ता, विवाह अनुदान, उद्योगास बीज भांडवल पुरवले आहे. अशा प्रकारचे साहाय्य राज्य व केंद्र शासनाने मागासवर्गीय, भटके, विमुक्त,

वंचित विकास जग आणि आपण/४६