पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

व्याप्ती वाढते आहे. संख्या वाढीच्या प्रमाणात संस्था, योजना व आर्थिक तरतूद वाढीबाबत आपण उदासीन राहिल्याने संस्थाबाह्य वंचित बालके गुन्हेगारी, अल्पवयीन शरीर विक्रय, अमली पदार्थांच्या वापरात वाहकाचे कार्य, बालमजुरी, बाल लैंगिक शोषण, रस्त्यावर राहणा-या बालकांची वाढती फौज आपल्या कल्याण व विकास प्रश्नांचा प्राधान्यक्रम कार्यक्रम होऊ शकला नाही. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, गतिमंद, बहुविकलांग, मूकबधिर, बालकांचे संगोपन, उपचार, निदान, साधन पुरवठा, शिक्षण प्राधान्य, नोकरी, आरक्षण इ. प्रश्नी आपली अनास्था म्हणजे आपल्या भावसाक्षरतेची दिवाळखोरीच! जग अपंगांच्या मानसिक उन्नयनाचं नियोजन करण्यात गुंतलं असताना आपण अपंगांच्या भौतिक सुविधा विकासाचे सरासरी लक्ष्यही गाठू शकलो नाही. जी काही थोडी प्रगती झाली त्यात शासनाचा वाटा किती व स्वयंसेवी संस्थांनी केलेली गुणात्मक प्रगती किती याचाही केव्हा तरी विचार होणे गरजेचे आहे. कुष्ठरोगी, देवदासी, वेश्या यांची अपत्ये, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, नैसर्गिक आपत्ती, अपघातातील बळी बालके, दंग्यात, दहशतीत अनाथ, निराधार झालेली मुले. विस्थापित कुटुंबातील मुले (उदा. धरणग्रस्त, सेझग्रस्त इ.), बंदीजनांची अपत्ये, हरवलेली, टाकलेली, सोडलेली मुले, एड्सग्रस्त मुले अशा वंचित बालकांचे साधे सर्वेक्षण करून संख्यामान आपण गेल्या ७० वर्षांत निश्चित करू शकलो नाही. त्यांच्या संगोपन, पुनर्वसनाच्या अद्यतन कार्यक्रमाचा (जपानसारखा) आपण येत्या ५० वर्षांत तरी विचार करू शकू का? ज्या देशात कुटुंबाधारित सामाजिक सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नसते त्या देशाचं बाल्य नेहमीच संकटग्रस्त असते' हे समाजशास्त्रीय तत्त्व आहे. त्याकडे डोळेझाक म्हणजे इतर विकासकामांवर केलेला खर्च वाया घालवल्यातच जमा असतो. याचं भान जोवर इथल्या राजकीय इच्छाशक्तीस येणार नाही तोवर इथली वंचित बालके वाच्यावर वाढणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

वंचित महिलांचा वनवास ।


 बालविवाहामुळे कोवळ्या वयात गर्भप्राप्ती, परिणामी प्रसूत माता व बालकमृत्यू प्रमाणात वाढ इत्यादी प्रश्न कायद्याच्या अकार्यक्षम अंमलबजावणीचे फलित होय. हुंडाबळीचे प्रमाण याच कारणामुळे आहे. पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळे स्त्रियांना येणारे वैधव्य, बाहेरख्याली पुरुष वृत्तीमुळे स्त्रियांच्या परित्यक्ततेत वाढ इत्यादीमुळे महिलांचे जीवन अस्थिर व धोकादायक बनत चालले आहे. घटस्फोटित महिलांची संख्या वाढण्याची पूर्वीची पुरुषकेंद्रित कारणे आहेतच.

वंचित विकास जग आणि आपण/४५