पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


सामाजिक न्याय : इतिहास


 भारताचा संपूर्ण सामाजिक विकास हा येथील वास्तवामुळे नेहमीच ब्रिटिशांच्या इतिहासावर आधारित, विकसित होत राहिला आहे. येथील समाज वास्तव, समाज परिवर्तन, सामाजिक कायदे, राजकीय व आर्थिक परिवर्तन या सर्वांमागे ब्रिटिश राजसत्ता व समाजसत्ता पायाभूत राहिली आहे. भारतीय राज्यघटनेने स्वत:ला कल्याणकारी राज्य म्हणून घोषित केले. त्यामागेही ब्रिटिश राज्यघटना कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही.
 समाज संक्रमणाचा आलेख पाहता असे लक्षात येते की, प्रत्येक काळात ‘सबाटैन' व्यवस्था कार्यरत असते. ही व्यवस्था वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यामधील उतरंड अधोरेखित करीत असते. अभिजन वर्ग वर्चस्वाने सुरू झालेल्या समाज विकासाची परिणती बहजनवर्ग विकासाकडे अग्रेसर होते, ती सर्व जन केंद्रित होते, हा या देशाचा इतिहास आहे. सर्वजनाचे अधिनायकत्व ज्या समाजव्यवस्थेत येते तो समाज प्रगल्भ खरा! सर्वजनाचे वर्चस्व म्हणजेच वंचित विकासाचा अंत्योदय होय.

वंचित : व्युत्पत्ती व व्याप्ती


 वंचित शब्दाचा अर्थ फसलेला, अंतरलेला, उपेक्षित, समाज परीघाबाहेरील अशा अर्थाने सर्वसाधारणपणे वापरला जातो. संस्कृतमध्ये त्याची व्युत्पत्ती वंचू+नियु+कत् अशा प्रकारे सांगितली जाते. त्याचा अर्थ उपेक्षित, न मिळालेला, कमतरता असलेला, संकटात सापडलेला, फसवलेला असा होतो. इंग्रजीत याला Deprive हा पर्यायवाची शब्द आढळतो. त्यांचे अनेक अर्थ शब्दकोशात आढळतात. त्यानुसार उपेक्षित समाजवर्ग, गरीब, निराधार, गरजू, तणावग्रस्त, अधिकार वंचित, मूलभूत गरजांपासून उपेक्षित असा घेतला जातो. या सर्व अंगांनी विचार केला तर समाजातील अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, हुंडाबळी, विधवा, परित्यक्ता, कुमारीमाता, बालविवाहिता, भिक्षेकरी, बालगुन्हेगार, वेश्या, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, विस्थापित, रोगजर्जर असे सर्व दु:खीपीडित, बळी या सर्वांचा समावेश 'वंचित' संज्ञेत होतो. हे पाहता परीघाबाहेरील वंचित हा समाजातील संख्येने मोठा परंतु उपेक्षेमुळे दुर्लक्षित राहिलेला, असंघटित, अल्पसंख्य वर्गात विखुरलेला, विकासअपेक्षी परंतु विकासलक्ष्यी समाजवर्ग होय. यांच्यासाठी स्वातंत्र्याच्या गेल्या ७० वर्षांत ज्या योजना, संस्था अस्तित्वात आल्या त्या या वर्गाची संख्या, गरजा, समस्यांचे स्वरूप पाहता नगण्य म्हणाव्या लागतील.

वंचित विकास जग आणि आपण/४३