पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

स्वीकारण्यात यावे. सर्व योजनांत निर्वाह भत्ता, अनुदान सूत्र, कर्मचारी सूत्र यात योजनानिहाय विशेषता सुरक्षित ठेवून सामाजिक न्यायात समानता आणावी. योजनांचा दर्जा वाढविण्यावर व तो टिकविण्यावर भर हवा. क्षेत्रातील अधिकारी व कर्मचा-यांच्या निरंतर शिक्षण/प्रशिक्षणास प्राधान्य व प्रोत्साहन देण्यात यावे. प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी अधिकार विकेंद्रीकरणाबरोबर पत्रव्यवहार सत्वर होण्याची पद्धती अमलात आणली जावी. अनुदान वितरणात दिरंगाई झाल्यास व्याज देण्याची तरतूद हवी. संस्थांच्या किमान दर्जा निश्चिती व नियंत्रणाची योजना व व्यवस्था असणे आवश्यक आहे. वंचित विकास योजनांची प्रशासकीय यंत्रणा संवेदनशील व तत्पर असायला हवी. शासकीय रूक्षता व तटस्थता टाळण्याचा सतत व जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. लाभार्थी विकास, लाभार्थी हित प्रथम अशी ध्येय, धोरणे स्वीकारून कार्यपद्धती निश्चित केली जावी. तरच वंचित विकास कार्यास गती येईल.

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/३७