पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

कोलमडली, त्या जागी नवी व्यवस्था उदयास आली. सृष्टीप्रमाणे समाज बदलाची पण एक गती, प्रक्रिया आणि पद्धत असते. जुनी जात व्यवस्था संपली नसली तरी येथील नागरिक जातीसाठी माती खायच्या मन:स्थितीतून मुक्त झाला. तो आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाचा समर्थक झाला नसला, तरी सहानुभूतीदार नक्कीच झाला आहे. मालक-मजूर भेद, संघर्ष संपून दोघेही एकमेकांचे अस्तित्व ओळखून परस्परपूरक भूमिका घेत आहेत. जगा आणि जगू द्या' मंत्र समाजात सुस्थिर झाला, तो ‘बळी तो कान पिळी'ला बगल देऊन. शेतीत, उद्योगात सर्वत्र हे झाले. स्त्री शिक्षणात भारतात क्रांती करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांमुळे सुरू झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एस्. एन. डी. टी. महिला विद्यापीठाची स्थापना करून विसाव्या शतकात गती आणल्याने स्त्री शिक्षण प्रसाराचा विचार घरोघरी पोहोचून प्रत्येक मुलगी शिकण्याची क्रांती महाराष्ट्रात वास्तवात उतरली. स्त्री मिळवती झाली. चूल आणि मूल' परीघ ओलांडून तिने जगास पालाण घालत उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग, शेती विज्ञान, संरक्षण कोणतेच क्षेत्र केवळ पुरुषांसाठी आरक्षित ठेवले नाही. तिच्या शिक्षण व स्वावलंबनाने ती पुरुष समान विकसित झाली. पण तिच्यावरील अन्याय राज्यात संपला असे नाही. स्त्री भ्रूणहत्या, कुमारीमाता, वेश्या, बलात्कार इत्यादींचे ओरखडे ओढणे अजून समाजात रोजचेच आहेत.
 झोपडपट्टया, गलिच्छ वस्त्या, अनारोग्य, कुपोषण, दलित आणि वंचितांवरील अत्याचार, गुन्हेगारी, दहशतवाद, जातीय दंगे, विस्थापन, बेरोजगारी, भिक्षेगिरी, अनाथांचे उद्ध्वस्त व निराधारपण, अपंगांची उपेक्षा यावर आपणास अजून विजय मिळवता आलेला नाही. तो यावा म्हणून वंचितांच्या विकासाच्या अनेक योजना महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासन आपापल्या स्तरांवर राबवत आहेत. महाराष्ट्रात महिला, बाल व अपंगांच्या विकास व कल्याण योजना समजून घेतल्या तर शासन या वर्गासाठी काय करते ते कळण्यास मदत झाल्याशिवाय रहाणार नाही.
१. महिला विकास योजना
 राज्यातील महिला विकासाच्या विद्यमान योजना प्रामुख्याने तीन प्रकारच्या आहेत. अ) निराधार, विधवा, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय व देवदासी महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या योजना. सदर योजनांद्वारे उपरोक्त वर्गातील गरजू महिलांना जिल्हा कार्यालयामार्फत अर्थसाहाय्य पुरविले जाते. १00 रुपयांपासून ते १0,000 रुपयांपर्यंत देण्यात येणारे अर्थसाहाय्य संस्थाबाह्य

वंचित विकास जग आणि आपण/२४