पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

येतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून निर्माण झालेली जातीसंस्था मजबूत होण्याचे कारणही पूर्वापार चालत आलेली जीवनसाधने होत.
 या पारंपरिक समाजजीवनास इंग्रजी आमदानीत छेद दिला गेला व शहही! इंग्रज आपल्याबरोबर प्रशासक, धर्मोपदेशक, सैन्य, शिक्षण कायदे घेऊन आले. त्याबरोबर त्यांनी आपली संस्कृतीही आणली. त्यातून भारतीय समाजजीवनात व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रसार झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांची रुजवण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स इ. युरोपीय देशांमुळे आणि विशेषतः तेथून वेळोवेळी आलेल्या इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगाली लोकांमुळे इथे झाली. त्यातून भारतातील सुशिक्षित वर्गाने बालविवाह प्रथा विरोध, सती प्रथा बंदी, स्त्री शिक्षण पुरस्कार, हुंडाविरोध, अस्पृश्यता, अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या सुधारणांचे समर्थन केले. त्यातून विविध समाज सुधारणा चळवळी इथे जन्माला आल्या. प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, महाराष्ट्र समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, सत्यशोधक समाज इथे उदयाला आले. त्यामागे युरोपातील चौदाव्या ते सतराव्या शतकात निर्माण झालेल्या प्रबोधन पर्व (Reneaissance) कारणीभूत होते. राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती, अॅनी बेझंट, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाह छत्रपती, रामस्वामी नायकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रभृती सुधारकांची एक मोठी परंपरा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आढळते. तिची पाळेमुळे इंग्रज आमदानीत आहेत हे आपणास विसरता येणार नाही. ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळही याचाच परिपाक होय.
 या विविध समाज सुधारणावादी आंदोलनाच्या समांतरपणे भारतात राजकीय स्वातंत्रजयाचे आंदोलन उदयाला आले. त्यात शेतकरी, मजूर जसे सामील झाले तसाच शिक्षित मध्यमवर्ग, तरुण व महिलाही सामील झाल्या. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रभृती स्वातंत्र्य सेनानींनी भारतात राजकीय जागृती घडवून आणली. त्याचा परिणाम म्हणून अस्मिता, अस्तित्वाचे स्फुलिंग भारतीय समाजात निर्माण झाले. स्वातंत्र्य, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती उदयास आली ती स्वातंत्र्य लढ्यातूनच.
 सुधारणावादी चळवळ, स्वातंत्र्य आंदोलनाच्या या काळात भारतीय समाजजीवनात परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे भारतात सुरू झालेली औद्योगिकीकरणाची सुरुवात. रेल्वे, रस्ते, तार, टेलिफोन, वाफेचे इंजीन, जहाजे, विमाने, मोटारी याबरोबर सुरू झालेल्या कापड गिरण्या, यंत्र कारखाने

वंचित विकास जग आणि आपण/१९