पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

पाहून वेतन देण्याचे उदार धोरण स्वीकारण्यात आले. पुढे सन १८३४ मध्ये इ. स. १६०१ च्या ‘पुअर लॉ' मध्ये दुरुस्ती करण्यात येऊन श्रमिकांची प्रतिष्ठा जपण्याचा तसेच ती संवर्धित करण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात वंचित विकास कार्यक्रमात क्रांती घडून येऊन सार्वजनिक हित व सामाजिक सुरक्षेचे तत्त्व स्वीकारून आरोग्य, विमा, इ. सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला. याच काळात दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने गलिच्छ वस्ती सुधारण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात येऊन सामूहिक घरकुले उभारण्यात आली. या नि अशा स्वरूपाच्या अनेक कल्याणकारी कायद्यांनी इंग्लंडचे समाजजीवन बदलून गेले.
 या काळात इंग्रजांचे साम्राज्य अनेक देशात विखुरलेले होते. ज्या देशात इंग्रजांच्या वसाहती होत्या व जिथे इंग्रजी राज्यसत्ता होती अशा सर्व देशांत इंग्लंडमधील वंचित विकास कार्यक्रमाचे पडसाद उमटले. अनेक युरोपीय देशांनी इंग्लंडच्या धर्तीचे कायदे व योजना अंमलात आणल्या. वंचित विकासाची कल्पना जगभर पसरली, मान्यता पावली. तिचे बरेचसे श्रेय इंग्लंडच्या सामाजिक सुधारणांना द्यावे लागेल. नंतरच्या काळात जगभर वंचित विकासाच्या अभिनव योजना अस्तित्वात आल्या, पण त्याची वैश्विक पाश्र्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय मात्र इंग्लंड, फ्रान्ससारख्या युरोपीय देशांनाच द्यावे लागेल.


◼◼









वंचित विकास जग आणि आपण/१७