पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

पातळीवर प्रारंभ झाला. वंचित विकास कार्यक्रमाची जनक योजना अशा प्रकारे सन १३४८ च्या दरम्यान सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. तत्पूर्वीच्या काळात वंचित कल्याण व विकासाच्या सार्वत्रिक विचाराची कल्पनाच अस्तित्वात नव्हती. एखादा प्रश्न अथवा समस्या सोडविणे हा ज्याचा त्याचा प्रश्न व्यक्तिगत प्रश्न मानला जायचा. सरंजामशाहीच्या काळात फार झाले तर अशा प्रश्नांना चर्चसारख्या संस्था उदारहस्ते मदत करायच्या इतकेच.
 चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंड वा युरोपात विपुल मजूर मिळायचे व तेही अल्पमजुरीत. त्यांचे जीवनमान मुळातच फार हलाखीचे होते; पण काळ्या आजाराच्या (Black Fever) अभूतपूर्व फैलावामुळे सर्व युरोपात मजुरांची भीषण चणचण भासू लागली. यात तत्कालीन सरंजामदार व जमीनदारांच्या शोषणामुळे त्याच्या जीवनाचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीच्या ध्यासातून इंग्लंडमध्ये तिस-या एडवर्डच्या कारकिर्दीत इ. स. १३५१ मध्ये ‘गरिबांचा कायदा (Poor Law) अस्तित्वात आला. जगातील पहिला कल्याणकारी कायदा म्हणून याची नोंद जागतिक वंचित विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी करावी लागेल. हा कायदा फार आदर्श व सर्वसमावेशक नसला, तरी एका सर्वथा नव्या यंत्रणा व व्यवस्थेचा प्रारंभ म्हणून त्याचे वेगळे महत्त्व नाकारता येणार नाही. या कायद्याने कल्याणकारी कार्याची नाळ राजसत्तेशी व शासन यंत्रणेशी जोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. हा कायदा पुढे सतत सुधारणांनी पुरोगामी बनविण्यात आला. एकट्या सोळाव्या शतकात या कायद्यात चार वेळा सुधारणा करण्यात आली. यावरून त्या काळात बदलत गेलेल्या समाजजीवन व सामाजिक प्रश्नांची कल्पना येते. कायदा बदलत गेला. अनेक नव्या सोयी, सवलती मिळत गेल्या, तसतशा शासन यंत्रणेकडून व कल्याणकारी संस्था व योजनांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत गेल्या.
 इ. स. १४९५ मध्ये ‘ट्यूडर अॅक्ट' (Tudor Act) अस्तित्वात येऊन भिक्षेकरी व भटक्या वृत्तीच्या नियंत्रणाचा प्रयत्न इंग्लंडमध्ये केला गेला. यातून भीक मागणे, विना उद्योग भटकणे गुन्हा ठरविण्यात येऊन अशा लोकांसाठी कल्याणकारी कार्यक्रम नि संस्था अस्तित्वात आल्या.
 सोळावे शतक हे वंचित विकासाच्या दृष्टीने संघर्षाचे शतक समजण्यात येते. या काळात धर्म व राज्यसत्ता अशा समांतर असलेल्या परंतु वंचित विकासाचे कार्य करणा-या यंत्रणांत श्रेष्ठत्वावरून, निरंकुश सत्ता केंद्र बनविण्याच्या प्रयत्नातून, संघर्षाची स्थिती निर्माण झाली. या काळात पोपच्या

वंचित विकास जग आणि आपण/१५