पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 अमेरिकेत मतिमंदांच्या शिक्षणात शिक्षणापेक्षा (लेखन, वाचन, स्मरण) व्यावहारिक व जीवनोपयोगी शिक्षणाद्वारे मतिमंदांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात आलेला आहे. मुलांची बुद्धिमत्ता अथवा बुद्ध्यांक यावर तेथील शिक्षण आधारलेले नाही. मतिमंदांच्या शिक्षणात प्रत्येक मतिमंदांची क्षमता प्रमाण मानण्यात येऊन त्याआधारे वैयक्तिक पाठ्यक्रम तयार केले जातात. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे शिक्षणाचे तत्त्व तिथे अंगीकरण्यात येते. मुलांना व्यवहारी ज्ञान देण्याच्या दृष्टीने शाळांत छोटी-छोटी दुकाने असतात. मुले आपल्या गरजेच्या वस्तू स्वतः खरेदी करतात. त्यासाठी त्यांना चलनवलन, विनिमय, चलन परिचय आदी गोष्टी चित्रात्मक पद्धतीने शिकवल्या जातात. वस्तूंवर किंमत म्हणून सरळ चलनच छापले जाते. (उदा. केकची किंमत पाच रुपये असेल तर पॅकिंगवर पाच रुपयांची नोट छापलेली असते.) अशा दुकानात शालेय वस्तू खाऊ आदी ठेवला जातो. तेथील शिक्षणात दीर्घ पल्याची उद्दिष्टे व अल्पकालीन कृतिकार्यक्रम निश्चित केलेला असतो. त्यासाठी व्यक्तिगत सेवा योजना केली जाते. पायरी-पायरीने विकास व प्रगती अपेक्षित असते.
 मतिमंदांच्या शिक्षण व निवासी संस्थांत समाज कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अमेरिकेतील अशा संस्थांतील निधी संकलन, मुलांसाठी किंवा योजना, प्रशिक्षण कार्यासाठी कामे मिळविणे अशी कामे करतात. काही संस्था केवळ मतिमंदांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचे कार्य करतात. मतिमंदांना देण्यात येणा-या कामातही गुणवत्ता पाहिली जाते. अमेरिकेत कुठेच गुणवत्तेत तडजोड असत नाही. मतिमंद म्हणून अपवाद नाही. म्हणून तिथे मतिमंदांची प्रगती अधिक दिसून येते. कोणीही व्यक्ती जन्मतः प्रशिक्षित असत नाही. हे लक्षात घेता मतिमंदांना दिले जाणारे प्रशिक्षण वेगळे आहे असे तिथे मानले जात नाही.
 मतिमंद प्रौढांच्या विवाहाचे तिथे प्रयत्न केले जातात. सामान्यांचे विवाह (ते सर्वार्थाने धडधाकट असताना) कधी-कधी अयशस्वी होतात. तिथे मतिमंदांचे झाले म्हणून काय बिघडले? असा विचार करून या संदर्भात प्रयत्न केले जातात. मतिमंदांना संगीताची विशेष जाण व आवड असते, हे लक्षात घेऊन त्यांना शिक्षण व प्रशिक्षण, विकास कार्यक्रमात संगीताचा वापर हा अमेरिकेतील शिक्षणाचा एक वेगळा भाग आहे. आपल्याकडे या बाबतीत अधिक लक्ष द्यायला हवे.
 (डॉ. शीला अडवानी, मनोविकार तज्ज्ञ, अमेरिका यांच्या कोल्हापूर येथील भाषणाचा गोषवारा)

वंचित विकास जग आणि आपण/११५