पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मतिमंदांच्या विकासात आई-वडील, अन्य प्रौढ पालकांचा सहभाग ६0% असेल, तर भावंडांचा तो ४0% तरी असायला हवा, असा तिथे कटाक्ष आहे. मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसनाची जबाबदारी हा तिथे शासनाच्या अंगभूत जबाबदारीचा भाग मानला जातो. तिथे मतिमंदांना शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन सोयी-सुविधा (सवलती नव्हे) मिळणे हा मतिमंदांच्या, सर्व अपंगांचा अधिकार मानण्यात येतो. शासन प्रत्येक अपंगावर ऐंशी ते शंभर हजार डॉलर्स म्हणजे साधारणपणे चाळीस लाख रुपये खर्च करते. अलीकडच्या काळात इतका प्रचंड खर्च करणे शासनास परवडत नसल्याने शासनाने अशा सेवांच्या खासगी कंत्राटाची पद्धत सुरू केली असून तो खर्च दरडोई तीस हजार डॉलर्स म्हणजे बारा लाख रुपयांपर्यंत खाली आणला आहे.
 मतिमंदांना स्वावलंबी करण्यासाठील तेथील शाळात जोडकामाचे प्रशिक्षण दिले जाते. शाळा मुलांसाठी कारखान्यातून, कार्यालयातून कामे मिळवितात. शिक्षकांच्या मदत-मार्गदर्शनाखाली ती पूर्ण केली जातात. फायदा, मजुरी मुलांना दिली जाते. प्रौढ मतिमंदांच्या लैंगिक गरजांबद्दल अमेरिकेतील समाजाचा दृष्टिकोन उदार व व्यापक आहे. मतिमंदांची लैंगिक गरज मान्य करून ती पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात, हे सारे सर्रास व सहज होते असे मानण्याचे कारण नाही. असे संबंध विधायक पद्धतीने विकसित करण्याच्या व लैंगिक भावनांच्या उदात्तीकरणासाठी सहलींचे आयोजन केले जाते. सामान्य माणसाप्रमाणे प्रौढ मतिमंदांनाही जीवनसाथी हवा असतो याचे भान या सर्वांमागे असते.
 अमेरिकेत असलेल्या विविध पन्नास राज्यांत अपंग कल्याणाचे धोरण व उद्धिष्टांत प्राधान्यक्रमात भिन्नता आहे. मॅसॅच्युसेट्स प्रांतात सुरक्षेस प्राधान्य आहे. संरक्षण, पर्यवेक्षण, संधी व साहाय्य अशा विविध अंगांनी मतिमंदांना साहाय्य केले जाते. मतिमंदांच्या कल्याण संस्थांत आवश्यक तो सर्व कर्मचारीवर्ग तज्ज्ञ असतो. शिक्षण, प्रशिक्षण, उपचार सर्व एकत्र व एकाच संस्थेत होत असल्याने प्रयत्नांत समन्वय असतो. त्यामुळे प्रगती झपाट्याने होते. उपचार, शिक्षण, प्रशिक्षण स्वतंत्र न ठेवता सर्व कर्मचारी, शिक्षक, तज्ज्ञ मिळून करत असल्याने नियोजन, तयारी, परिणाम, निरक्षण, मूल्यमापन सर्व स्तरांवर समन्वय साधणे शक्य होते. प्रयत्नांचे निश्चित कालबद्ध मूल्यमापन करून आगामी पाठ्यक्रम, उपचार ठरवले जातात. यासर्वांत सामूहिक विचार-विनिमयांवर भर असतो. मतिमंदांच्या विकासाचे परिमाण तिचे प्रयोगांती निश्चित करण्यात आले आहे. त्या आधारे प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. मतिमंद मुले आक्रमक असतात. अपयश त्यांना आवडत नसते. हे सर्व लक्षात घेऊन नियोजन केले जाते.

वंचित विकास जग आणि आपण/११४