पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 अमेरिकेतील मतिमंदांच्या शाळांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार चालते. शाळेची वेळ साधारणपणे आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते. शाळेतील मुले व शिक्षकांचे प्रमाण एकास एक असते. येथील मतिमंदांच्या शिक्षण संस्था पाल्याबरोबर पालकांचेही शिक्षण, प्रशिक्षण, प्रबोधन कार्य आवर्जून करतात.
 मतिमंद पाल्यांच्या पालकांना उसंत मिळावी म्हणून शाळा आठवड्यातील पाच दिवस रोज किमान सात-आठ तास मन:पूर्वक मेहनत घेते. पालकांना उसंत देण्याबरोबर त्यांच्यात संयम व सहनशक्ती विकसित करण्यावर धैर्य, धीर देण्यावर शाळांचा भर असतो. बहुविकलांग पाल्यासाठी अल्पकालीन निवास व्यवस्था करून पालकांना दिलासा दिला जातो. अशा पाल्यांसाठी घरी वा शाळेत विशेष साहाय्यक नियुक्त केले जातात.
 अमेरिकेतील मतिमंदांचे शिक्षण, प्रशिक्षण, संगोपन, पुनर्वसन कार्य करणाच्या संस्था आपल्या कार्याची भरपूर प्रसिद्धी करतात. विशेषतः शाळा वा संस्था ज्या अपवादात्मक गुणवैशिष्ट्ये असलेल्या मुला-मुलींचे प्रश्न सोडवतात, अशा प्रयत्नांच्या प्रसिद्धीवर भर असतो. अलीकडच्या काळात संस्थाबाह्य सेवा पुरविण्याकडे तेथील संस्थांचा भर आहे. त्यामुळे संस्थेऐवजी घर, समाज ही मतिमंदांचे प्रश्न सोडविण्याची योग्य ठिकाणे असल्याचे भान तेथील समाजाला आले आहे. संस्थांत कर्मचा-यांचे प्रमाण निश्चित असले, तरी लाभार्थीची गरज ही त्याची प्रमुख कसोटी मानली जाते. संस्थेतील मतिमंद मुले स्वावलंबी करण्यावर संस्थांचा भर असतो. मतिमंद मुलांचे वर्तनविषयक प्रश्न, भावविश्व, त्यांच्या शारीरिक हालचालींची क्षमता व मर्यादा लक्षात घेता ज्या मुलांचा घरी सांभाळ होणे अशक्य असते अशाच मुला-मुलींना मतिमंदांच्या निवासी संस्थांत प्रवेश दिला जातो. अशा संस्थांतील मुलांच्या क्षमतांचे मूल्यमापन करून त्यांच्या प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम निश्चित केला जातो. यात मतिमंदांच्या क्षमतांच्या अधिकाधिक विकासाचे धोरण असते. अशा मुलांच्या मर्यादा वा त्रुटींवर लक्ष केंद्रित करून त्या दूर केल्या जातात. याबरोबरच पालकांना घरी साहाय्य देण्यासही तेवढेच महत्त्व दिले जाते.
 मतिमंद मुलांच्याबाबतीत निवासी शाळा, वा सामूहिक निवासात नाइलाज वा गरज म्हणून प्रवेश देण्याचे शासनाचे वा संस्थांचे धोरण आहे. याचे कारण अमेरिकेत मतिमंद पाल्यासंदर्भात तेथील पालक उदासीन असतात. जबाबदारी टाळण्याची वृत्ती असते आपल्या पाल्याच्या प्रश्नात, ते सोडवण्यात पालकांच्या मानसिक गुंतवणुकीस व सक्रिय सहभागावर आज तिथे भर दिला जातो. भारतातील पालकांत हा भाग दिसून येतो, ही आनंदाची गोष्ट होय. घरातील

वंचित विकास जग आणि आपण/११३