पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


अमेरिकेतील मतिमंदांचे शिक्षण व पुनर्वसन


 मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसनविषयक आधुनिक संकल्पनेचा विचार करताना मी सर्वप्रथम एक गोष्ट करू इच्छितो की मतिमंदांचे शिक्षण व पुनर्वसनविषयक जे प्रयत्न व पद्धत भारतात अंगिकारली जात आहे ती या क्षेत्रातील सर्वाधिक आधुनिक होय. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेतील या क्षेत्रातील तज्ज्ञ पालकांना असे आवाहन करीत ‘आपण आपल्या मतिमंद पाल्यास आमच्या संस्थेकडे सुपूर्द करा व निश्चित राहा. समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सान्यांनी मिळून केलेल्या आवाहनाचा परिणाम असा झाला की, अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स स्टेटमधील एका शहराच्या पंचक्रोशीतील पंधराशे मुला-मुलींनी आमच्या निवासी शाळेत प्रवेश घेतला व पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो इतका की ते पालक नंतर चक्क हे विसरून गेले की आपणास मतिमंद पाल्य आहे. मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसनात शाळेइतकाच महत्त्वाचा भाग पालकांचा असतो, ही आता जग मान्य गोष्ट आहे. त्यामुळे मतिमंद मुलांनी घरी राहावे, पालकांनी त्यांच्या संगोपन व पुनर्वसनात सतत सक्रिय राहावे, शाळांनी त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे, अशी मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसनाची आधुनिक संकल्पना आहे. भारतातील मतिमंदांच्या बहुसंख्य शाळांतील मुले घरी राहतात व शाळेत शिकतात. त्यांच्या शिक्षण व पुनर्वसनात भारतातील पालक शिक्षकांच्या खांद्यास खांदा लावून चालत असल्याचे दृश्य आधुनिक तर आहेच, शिवाय प्रगत देशांनी या संबंधांच्या अनुकरणाची गरज आहे.
 हा नवा दृष्टिकोन अमेरिकेतील मतिमंदांच्या शिक्षण संस्थांनी धोरण व आदर्श व्यवस्था म्हणून मान्य केल्याने जिथे पूर्वी पंधराशे मतिमंद मुले-मुली शिकत होती (निवासी शाळेत) तेथील संख्या आता शंभराच्या घरात येऊन पोहोचली आहे. उर्वरित सारी मुले एक तर बहुसंख्येने स्वत:च्या पालकांसमवेत घरी राहतात, तर काही मतिमंदांसाठी चालविल्या जाणा-या समूह निवासात.

वंचित विकास जग आणि आपण/११२