पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


रशियातील अनाथ बालकांचे संगोपन कार्य


 रशिया हा साम्यवादी देश आहे. या देशात सन १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर सर्व थरातील लोकांचे विशेषाधिकार रद्द करण्यात आले. अपवाद करण्यात आला तो फक्त बालकांचा. त्यामुळे रशियाच्या संदर्भात नेहमी असे सांगण्यात येते की, बालक हा विशेषाधिकार असलेला रशिया जगातील एकमेव देश होय आणि ते खरेही आहे. पहिल्या महायुद्धात १९१४ साली झारला रशिया सामील झाला. या युद्धाच्या तीन वर्षांच्या अल्पावधीत निरनिराळ्या युद्धक्षेत्रात हजारो लोक मृत्युमुखी पडले. घरचा कर्ता पुरुष कामी आल्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली. लाखो मुले व तरुण निराधार, अनाथ झाले. रस्त्यावर भरकटणाच्या, भिक्षा मागणाच्या मुलांच्या टोळ्यांच्याटोळ्या फिरू लागल्या. सर्वत्र दारिद्रय, गुन्हे इत्यादींचे साम्राज्य पसरले होते. सन १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर या बालकांच्या संगोपन व पुनर्वसन विषयक कार्याकडे आस्थेने पाहिले जाऊ लागले. असे असले, तरी युद्धकाळातही या बालकांकडे विशेष लक्ष पुरविण्याकडे रशियन समाज दक्ष होता.
 बाल कल्याणकारी कार्याविषयीची रशियन समाजाची जागृती अनुकरणीय आहे. १९१२ साली त्यांनी लहान मुलांच्या पौष्टिक आहारासाठी स्थानिक निधीची' स्थापना केली होती. त्या काळात या कार्यासाठी पाच कोटी रुबल्सचा निधी उभारण्यात आला होता. ऑक्टोबर क्रांतीनंतर अनाथ, निराधार, बालगुन्हेगार बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या संगोपन, संरक्षण, पुनर्वसन कार्याची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला. ४ जानेवारी, १९१९ रोजी ब्लादीमीर लेनिननी एक खास आदेश काढून बालगुन्हेगारांना त्या वेळी दिली जाणारी तुरुंगवासाची शिक्षा रद्द केली. लहान मुलांत कोणीही गुन्हेगार नसतो' अशी त्यांची धारणा होती. नंतर फेब्रुवारीत लगेच अनातोली लुनाचास्र्की यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून बालकांच्या संरक्षणाच्या उपाय योजनांचा प्रारंभ झाला. त्या

वंचित विकास जग आणि आपण/१०७