पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

म्हणाले की, ही सर्व व्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. अधिक वैज्ञानिक पद्धतीने या मुलांचे संगोपन करता यावे म्हणून समोर नवी इमारत, नवी साधने इत्यादी सुविधा उभारण्यात येत असून लवकरच ती उपयोगात येईल. तिथे कॉम्प्युटराईज्ड क्लिनिक, टेस्ट ट्यूब बेबी प्रिझव्र्हेशन सेंटर इत्यादी सुविधा असतील. हे सर्व पाहात असताना आपल्याकडे 0 ते १८ वयोगटातील सर्व अनाथ मुला-मुलींना दरमहा १२५ रु. नि तेही अनियमितपणे देणाच्या शासनाचा या कामाकडे असलेला निराशा वाढविणारा, उपेक्षेचा दृष्टिकोन ठळकपणे वारंवार पुढे येत होता.
 केंद्रातील सहा ते नऊ महिने वयोगटातील अर्भकांचा विभाग पाहात असताना एक दांपत्य मुलास दूध पाजत असलेले पाहिले. माझ्या चेह-यावरील जिज्ञासा पाहून नर्सने सांगितले की त्या दाम्पत्याने त्या मुलास दत्तक घ्यायचे ठरविले आहे. दत्तक विधान पूर्व कालखंडात आई-वडिलांमध्ये मुलाच्या संगोपनाची आवड आहे का? मुलगा त्यांच्या संगोपनास कितपत प्रतिसाद देतो, शिवाय मुलात व पालकात मातृत्वभाव विकसित होण्यासाठी दत्तक आई-वडिलांनी दत्तक विधानपूर्व कालात आपल्या भावी पाल्याच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ घालवणे अपेक्षित असते. या काळात त्या मुलांच्या सर्व प्रवृत्ती, कमतरता, सवयी, संगोपन, दक्षता इत्यादीची पालकांना माहिती व व प्रशिक्षण दिले जाते. मंडईतील भाजी निवडावी तशी मुलांना निवडणारे आपले पालक व कागदोपत्री पूर्ततेसाठी पालकांना जीवघेणा त्रास देणारे आपले अधिकारी व संस्थांच्या पार्श्वभूमीवर येथील कार्यपद्धतीपासून आपणास बरेच शिकता येण्यासारखे आहे, याची जाणीव झाल्यावाचून राहिली नाही.
 पुढे कुमार व किशोर वयोगटातील मुलांची संस्था पाहिली. आपल्याकडील निरीक्षण गृहांसदृश असलेली संस्था या कार्याचे नवे परिमाण देऊन गेली. मुले मोठी होत जातील तसा त्या विभागाचा कर्मचारी वर्ग कमी होत जातो. मुलांनी आपसूक स्वावलंबी व्हावे हा त्यामागचा विचार असतो. इथे पर्यवेक्षक, काळजीवाहक, शिक्षक, डॉक्टर हे सर्व कर्मचारी असतात, पण मुलांच्या दैनिक कार्यक्रमात फार कमी हस्तक्षेप करतात. एक तर अशा संस्थांत मुलांची संख्या ४0 पेक्षा अधिक असत नाही. समजायच्या वयात प्रत्येक मुलास स्वतंत्र खोली दिली जाते. त्या खोलीत सर्व सोयी/सुविधा (प्रसाधन कक्ष, स्वयंपाक कक्ष इ.) असते. संस्थेचा परिपाठ, दिनक्रम असतो, पण मुलांच्या पाठ्यक्रम/ नोकरी/ शाळा इत्यादीनुसार त्यात सूट असते. आपल्यासारखे एकाच प्रकारचे गणवेशात्मक पोषाख, शिस्तीच्या नावाखाली सर्व विधी व क्रिया ओळीत, कायम हाताची घडी तोंडावर बोट, पाहुणा येताच एक साथ

वंचित विकास जग आणि आपण/१०३