पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

केली जातात. संक्रमण काळात अशा स्त्री-पुरुषांना किमान निर्वाह भत्ता, गरज भासल्यास हंगामी निवारा इत्यादी सोयी दिल्या जातात. यातून प्रश्न सुटला नाही की मग अशा स्त्री-पुरुषांना, बहुधा स्त्रियांना त्यांच्या अपत्यांसह आधार केंद्रात पाठवले जाते.
 असे एक आधार केंद्र पाहण्याचा योग आला. तिथे कुमारीमाता, घटस्फोटित पत्नी, विवाह विच्छेदाने निराधार झालेल्या स्त्रिया, शिवाय अनाथ, अनौरस, निराधार मुले-मुलीही होत. स्त्रियांच्या विभागात प्रत्येकीस स्वतंत्र खोली (सर्व सोयींनीयुक्त) ची सोय होती. अशा स्त्रियांना आपल्या अपत्यांसह राहण्याची मुभा असते. एका मोठ्या हॉलमध्ये आठ कॉट्स पाहून मी आश्चर्याने विचारले की, हा कोणता विभाग? मला सांगण्यात आले की, “हे मिसेस रिचर्डचे घर आहे. तिच्या नव-याने तिला सोडले आहे. ती आपल्या तीन मुले व चार मुलींनिशी गेली तीन वर्षे इथे राहते.' अशी स्त्री आपल्या अपत्यांसह जेव्हा संस्थेत येते तेव्हा तिची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जबाबदारी शासनाची असते. शासन तिला व तिच्या प्रत्येक अपत्यास मान्य दराप्रमाणे निर्वाह भत्ता देते. संस्थेत भोजनाची सोय असली तरी तिला ते घेणे न घेण्याचे स्वातंत्र्य असते. ती संस्थेत राहात असली तरी तिला नि तिच्या मुलांना संस्थेत घरच्या इतकेच मुक्त वातावरणात व सहजपणे राहता येते.
 या संस्थेस जोडून असलेले अर्भकालय व बालसदन पाहिले. तेथील मुलांच्या चेह-यावरील प्रसन्नता, उत्साह, सहजता पाहिली नि आपल्याकडील अशा संस्थांतील मुला-मुलींचे भेदरलेले, अबोल चेहरे आठवतात. तेथील सर्व संस्थात नैसर्गिक वाढ, स्वातंत्र्य, भावनिक समायोजन इत्यादीस असाधारण महत्त्व असल्याचे निरीक्षणांती दिसून आले.
 ‘सेंटर डिपार्टमेंटल दी इन्फ-टस्' ही अशाच प्रकारचे काम करणारी संस्था पाहिली. तेथील बालसदन पाहन मी थक्कच झालो. अनाथ, अनौरस बालकांची संगोपन व्यवस्था आपल्याकडील अमीर-उमरावांच्या घरीही दुर्लभदिवसातील अर्भकांचा विभाग, गरोदर कालावधी पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या अर्भकांचा विभाग, अर्भकांचा अतिदक्षता विभाग, सांसर्गिक रोगग्रस्त अर्भकांसाठी रोग नियंत्रण कक्ष, त्यांच्या आहाराचे केंद्र, तेथे निर्जन्तुकीकरणाची अद्ययावत व्यवस्था, प्रशिक्षित परिचारिका, डॉक्टर, काळजीवाहक, महिन्यातील अर्भकांचे वयोगटनिहाय कक्ष, खेळघर, आहार कक्ष, तिथे आहार तज्ज्ञांची नियुक्ती, बाग-बगीचा, प्राणी संग्रहालय, पक्षीघर; किती नि कोणत्या सोयी सांगू? हे सर्व पाहात मी दिङ्मूढ होत असतानाच या केंद्राचे संचालक श्री. कोहन

वंचित विकास जग आणि आपण/१०२