पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/598

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रो० मॅक्सम्यूलर यांचा मृत्युं. ५८१ वाटल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं. केसरीकारास तर हा न्याय विशेषें करून लागू पडतों हें येथे सांगितले पाहिजे असें नाहीं. अशा त-हेच्या समदृष्टीच्या विद्वानास सर्व देशांतील राजांनीं, राजपुरुषांनीं आणि विद्यापीठांनीं सन्मान देण्यास नेहमी उत्सुक असावें हें साहजिकच आहे. 'विद्वान् सर्वत्र पूज्यते’ असें आम्हीं वर म्हटलेंच आहे व त्याप्रमाणें ग्रीस,रोम,टर्की,फ्रान्म,जर्मनी,अमेरिका,स्वीडन,इंग्लंड वगैरे सर्व राष्ट्रांतील लोकांनी मॅक्सम्यूलरसाहेबांची विद्वत्ता,बुद्धिमत्ता व जबर विद्याव्यासंग अणि सात्त्विक स्वभाव ओळखून त्यांस डॉक्टर, नाईट, प्रिव्ही कौन्सिलर इ. अनेक सन्मानाच्या पदव्या दिल्या होत्या व निरनिराळ्या देशांत विद्यावृद्धयर्थ किंवा शास्त्रीय शोध करण्याकरितां ज्या मंडळ्या निघाल्या आहेत त्या सर्वांनी आपले सदस्यपद यांस प्रेमानें अर्पण केले होतें. तथापि हा सर्व मान विद्यामूलकच असल्यानें प्रो.मॅक्सम्यूलर या विद्यामूलक उपपदानेंच त्यांचे आम्हीं वर्णन केले आहे. या सर्व मानांस ते पात्र होते हें त्यांच्या अचरणावरून व लेखावरून आज सर्वत्र जाहिर झालेलें आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती देत बसल्यास पुष्कळ विस्तार होईल. सबब त्यांच्या सत्कर्माप्रमाणे त्यांस सद्गति मिळो व अशीं विद्वद्रत्ने पुष्कळ निपजोत अशी ईश्वराची प्रार्थना करून आम्ही हा लेख संपवितो.