पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/594

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रो० मॅक्सम्यूलर यांचा मृत्यु. ५७७ विचारक्रांति झाली तिचें शोधकबुद्धीनें व मार्मिकपणानें परीक्षण करणारे विद्वान् जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांतून पुष्कळ झाले व अद्यापही हयात आहेत. रॉथ, बोथलिंग, बॉप, बॅर्नाफ् , डार्मेस्टेटर, वेबर, बुल्हर व अगदीं अलिकडील लडविग, ग्रासमन, व्हिटने वगैरे विद्वानांची परंपरा जर्मनी व फ्रान्स या देशांमध्यें बरीच झालेली आहे व त्यांनीं प्राच्य भाषा, प्राच्य धर्म, सर्व धर्मांची व भाषांची तुलना वगैरे विषयांवर अनेक ग्रंथ लिहून ठेविलेले आहेत; इतके कीं प्राच्य भाषांचा किंवा धर्मग्रंथाचा इतउत्तर जर कोणास सूक्ष्म व नव्या पद्धतीनें अभ्यास करावयाचा असेल तर या पाश्चात्य विद्वानांचे ग्रंथ वाचल्याखेरीज त्याच्या अध्ययनाची परिपूर्ति कधींही व्हावयाची नाहीं. पण हे ग्रंथ प्रायः जर्मन आणि फ्रेंच या भाषेतच असल्यामुळे पृथ्वीतील नाना देशांतून त्यांचा जितका प्रसार किंवा प्रसिद्धि व्हावयास पाहिजे तितकी झालेली नाहीं. मॅक्सम्यूलर यांनी आपल्या ग्रंथांतून घातलेले विचार सर्वच त्यांचे आहेत असें नाहीं. जर्मन व फ्रेच पंडितांच्या विचारसरणीचेंच प्रायः त्यांनीं अवलंबन केलेले असून सदर पंडितांचेच विचार आपल्या मोहक व गोड भाषेत त्यांनी व्यक्त करून दाखविले आहेत. पण मॅक्सम्यूलरसाहेबांची विशेष प्रसिद्धि होण्यास मुख्य कारण म्हटलें म्हणजे ते इंग्लंडांत येऊन राहिले व इंग्रजी भाषेचा पुरा अभ्यास करून तदद्वारा त्यांनी आपले विचार जगापुढे मांडले हें होय. इंग्रजांचे राज्य व इंग्रजी भाषा हल्लीं जगावर चोहोंकडे पसरलेली आहे. करितां जर्मन किंवा फ्रेंच भाषेत लिहिलेल्या ग्रंथांपेक्षां इंग्रजी भाषेंत लिहिलेल्या ग्रंथांचा स्वभावत:च अधिक प्रसार होतो व कोणतीही नवी गोष्ट किंवा तत्त्व या भाषेच्या द्वारें जगांत अधिक प्रसिद्धीस येतें; त्यांतूनही प्रो.मॅक्सम्यूलरसारखा मोहक आणि गोड भाषा लिहिणारा जर्मन कवीचाच मुलगा लेखक मिळाल्यावर मग तर विचारावयासच नको.बॅर्नाफ्, बॉप वगैरे फ्रेंच किंवा जर्मन महापंडितांच्या नवीन विचारांचीं सणगें त्यावर इंग्रजी ‘पॉलिश' चढवून मॅक्सम्यूलरसाहेबांनीं जगापुढे जेव्हां पहिल्यानें विक्रीस मांडलीं तेव्हां या वस्त्रांच्या सौंदर्यानें ग्राहकांचे डोळे दिपून जाऊन भाषासैौदागारांत प्रो.मॅक्सम्यूलर यांस त्यांनी अग्रस्थान दिले यांत कांहीं आश्चर्य नाहीं. विचारांची अपूर्वता, भाषेचें सौंदर्य, मार्मिक आणि सप्रमाण नवीन शेोध आणि इंग्रजी भाषेचा सार्वत्रिक असलेला प्रचार या गोष्टी एकत्र झाल्यावर कोणती विचारक्रांति व्हावयाची नाहीं ? जर्मन किंवा फ्रेंच पंडितांनीं प्राच्य भाषा, प्राच्य ग्रंथ आणि प्राच्य विचार यांस तावून सुलाखून व पूर्ण कसोटीस लावून तयार केल्यावर त्या विचारांची योग्यता व महत्त्व सोप्या, मोहक आणि सर्वत्र प्रचलित असलेल्या भाषेत लोकां