पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/586

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डेक्कन एज्युकेशन सोसायटींतील पांचवा मृत्यु ! ५६९ रावजींची शैली केसरीच्या वाचकांस पूर्णपणें माहीत आहेच. किंबहुना केसरीस सध्यांची स्थिति येण्यास गोपाळराव हे पुष्कळ अशीं कारणीभूत झाले होते इतकेंच नव्हे तर, केसरीचे एडिटर याच नात्यानें त्यांचा व महाराष्ट्रातील लोकांचा कांहीं वर्षे परीचय होऊन तो संबंध कोल्हापुर प्रकरणानें अधिक दृढ झालेला होता. अशा प्रकारचा संबंध तोडण्याचा कोणासही प्रसंग येणें ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. असो; देशी वर्तमानपत्रांस हल्ली जर कांहीं महत्त्व आले असले तर तें बयाच अंशीं रा. रा. आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे व मार्मिक लेखांचे फल होय असें केोणीही कबूल करील. शाळा व कॉलेज यांचे काम करून राहिलेला वेळ आज १५ वर्षे त्यापासून म्हणण्यासारखी कांहीं किफायत नसता त्यानीं बर्तमानपत्रे चालविण्यांत घालविला, यावरून मराठी भाषेच्या द्वारें आपले विचार लोकांपुढे मांडून त्यांस एक प्रकारें शिक्षण देण्याची गोपाळरावजींची उत्कट इच्छा व हौस पूर्णपणें व्यक्त होते हें कोणासही मान्य होईल. गोपाळरावजींस दम्याची विकृति पहिल्यापासूनच होती; त्यामुळे त्यांच्या शरीराची काठी मजबूत असतांही आज सतत १०॥१२ वर्षे ते थेोडबहुत आजारी होते. त्यांनीं औषधोपचार पुष्कळ करून पाहिले; किंबहुना अतिशय केले असें म्हटलें तरीही चालेल. पण त्यापासून कांहीं गुण आला नाहीं व गेलीं एकदोन वर्षे तर त्यांची प्रकृती पुष्कळ थकली होती. शेवटीं शेवटीं त्यांच्या प्रकृतीसही निकार होऊन त्यामुळे पायांस सूज आली व अखेरीस उदर होऊन त्यांस काल सकाळीं देवाज्ञा झाली ! त्यांच्या मृत्यूमुळे एकंदर महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे व विशेषतः डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे केवढे नुकसान झाले आहे हें सांगावयास नकोच. कै. चिपळूणकर, आपटे, केळकर, धारप आणि आगरकर हे पांचजण न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाल्यापासून आज १५ वर्षात नाहींसे व्हावेत ही कोणत्याही संस्थस काहीं लहानसहान आपत्ती नव्हे. त्यांतून ज्या संस्थेत शिरण्यास स्वार्थत्याग करणे अवश्य असल्यामुळे जेथे चांगले व विद्वान् शिक्षक थेोडच असावयाचे अशा संस्थेस तर ही खरोखरच अपरिहार्य व दुर्धर आपत्ती आहे. तथापि अशा वेळीं न डगमगतां कॉलेजच्या चालकांनी आपला उद्योग पूर्वीप्रमाणेच धैर्यानें चालू ठेविल्यास या संस्थेचे उद्देश लक्षांत आणून त्याकरितां स्वार्थत्याग करून या संस्थेत शिरणारे विद्वान गृहस्थ त्यांस कालांतरानें मिळणार नाहीत असें आम्हांस वाटत नाहीं. कै. विष्णुशास्री चिपळूणकर, आपटे, आगरकर, इत्यादिकांच्या चरित्रांचा व लेखांचा जर कांहीं महाराष्ट्रावर परिणाम घडला असला, तर तो आम्ही म्हणतों अशाच रीतीचा असला पाहिजे; व तो तसा आहे अशी आम्हांस उमेद आहे. गोपाळरावजींच्या मृत्यूनें त्यांच्या कुटुंबावर व अल्पवयी मुलांवर तर मोठाच प्रसंग गुदरला आहे. तथापि कालाकडे नजर देऊन आणि महाराष्ट्रातील सर्व लेोक त्यांच्या दुःखाचे वांटेकरी आहेत हें लक्षांत आणून त्यांनी आपले समाधान करून घेतले पाहिजे. ईश्वर ठेवील त्या स्थितीत राहणें भाग आहे !