पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६४ लो० टिळकांचे केसरींतील लेख. आहेत, त्या स्वतंत्र आहेत किंवा द्रव्याश्रित आहेत, अनादि आहेत किंवा सादि आहेत इत्यादि गूढ प्रश्नांचा सूक्ष्म विचार करून अखेरीस ज्योतिष, जीवनशास्र, मानसशास्र, वगैरे शास्रांतील अनेक दृष्टान्त देऊन तद्वारा स्पेन्सरसाहेबांनीं असें ठरविलें आहे कीं, द्रव्य व गती हीं ज्या ठिकाणी आविर्भूत होतात अशी कांहीं तरी वस्तु त्यांच्या मुळाशीं आहे; परंतु तिच्या सद्भावनेखेरीज तिचे दुस-या प्रकारचे ज्ञान आपणास होऊं शकत नाहीं. जगामध्यें जें जें कांहीं दृश्यमान होतें तें, आणि त्याची मूल अवस्था अर्थात् द्रव्य आणि गती यांचा संघात हीं या अज्ञेयाचींच आविर्भूत स्वरूपें होत असें स्पेन्सरसाहेब म्हणतात. पण आपले सर्व विचार दिक्कालादिकांनीं मर्यादित असल्यामुळे दिक्कालादिकांच्या उपाधींनीं विरहित असें जें आदितत्त्व त्यासंबंधानें आपणांस अधिक ज्ञान होणे अशक्य आहे असे त्यांनीं सिद्ध करून दाखविले आहे. वेदान्तांतील परब्रह्मही अशाच प्रकारचे अज्ञेय असून तें सत्, चित् आणि आनंदरूप आहे, यापेक्षां जास्त कांहीं सांगवत नाहीं असें जें वेदान्त्यांचे तत्त्व आहे त्याचा आणि स्पेन्सरसाहेबांनीं सिद्ध केलेल्या सत्तारूप अज्ञेयाचा बहुतेक अंशीं पूर्ण मेळ आहे असें यावरून ध्यानांत येईल. सारांश जगाच्या बुडाशीं जें तत्त्व आहे तें जरी अज्ञेय असले तरी तें चिद्रप आहे एवढे तरी त्याबद्दलचे ज्ञान आपणांस होर्ते असें स्पेन्सरसाहेबांनीं सर्व आधुनिक शास्राचा विचार करून सप्रमाण व व्यवस्थित रीतीनें सिद्ध केलेले आहे. आणि या बाबतीत सांख्यापेक्षां एक पाऊल ते पुढे गेले असून वेदान्तांतील ब्रह्मवाद्यांच्या मतांशीं त्यांची एकवाक्यता आहे. जगाच्या मुळाशीं जें हें अज्ञेयतत्त्व त्याचेच दृश्य जग हें आविर्भूत किंवा विकृत स्वरूप आहे असें मानल्यावर सदर स्वरूपास एकप्रकारें सापेक्ष अनित्यता प्राप्त होतें हें सागावयास नकोच. स्पेन्सरीय तत्त्वज्ञानापासून वेदांतमताचे जरी अशा प्रकारें पुष्टीकरण झाले तरी दुस-या एका बाबतीत स्पेन्सरसाहेबांचे मत बहुतेक प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या मतांशीं अगदीं विरुद्ध आहे. हें मत चैतन्य किंवा जीव या संबंधाचे होय, चैतन्यरूप जीव नित्य आहे, अविनाशी आहे, देहाव्यतिरिक्त तो राहूं शकतो असे सांख्य, वेदान्त, न्याय किंवा वैशेषिक या सर्वाचे म्हणणें आहे. पण स्पेन्सरसाहेब असे म्हणतात कीं, ज्याप्रमाणें गति नेहमीं द्रव्याश्रित असते त्याप्रमाणें चैतन्यही देहामधील विशिष्ट रीतिर्ने परिणत झालेल्या मेंदुखेरीज अन्यत्र दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. संज्ञा किंवा संवेदनशक्ति मेंदूतच असतें इतकंच नव्हे, तर या दोहोचा संयोग नित्य असल्यामुळे मेंदूव्यतिरिक्त संवेदनशक्ति राहते असे मानण्यास कांहीं पुरावा नाहीं, सारांश, संज्ञा किंवा संवेदनशक्ति ( Consciousness) ही देहाच्या नाशाबरोबरच नाहींशी होते असें स्पेन्सरसाहेब मानतात. म्हणजे या बाबतीत * नहि प्रेत्य संज्ञाऽस्ति ? हें चार्वाकाचे मत त्यांस ग्राह्य आहे. देहाव्यतिरिक्त संज्ञाशाक्त किंवा आत्मा राहणेच जर अशक्य तर पुनर्जन्मादि कल्पना किंवा देहाच्या मरणानंतर जीवाची अमुक एकप्रकारची स्थिति