पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. होरा, वगैरे शब्द परकीय आहेत ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे; व इंग्रजी लोकांसही त्याचप्रमाणें त्यांचा ज्या देशांशीं संबंध आला त्या त्या देशांतील शब्द आपल्या भाषेच्या कोशांत सामील करून घ्यावे लागले आहेत. हाच मार्ग मराठी भाषेतही स्वीकारण्यास कांहीं हरकत नाहीं. मात्र तो स्वीकारतांना एवढी खबरदारी घेतली पाहिजे कीं, त्यामुळे मराठी भाषेचा मराठीपणा मोडणार नाहीं. सारांश, प्रो. रानडे यांनी हा जेो उद्योग आरंभिला आहे तो महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस अत्यंत आवश्यक आहे,हें कोणीही सुज्ञ मनुष्य कबूल करील. गेल्या ३०॥४० वर्षांत मराठी भाषेस एक प्रकारचे नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे; आणि त्यांत स्पेन्सरचे तत्त्वज्ञान, मिल्लचे अर्थशास्र, किंवा हक्स्ले, टिंडाल, वैगरे आधिभौतिक शास्रावरील विचार येऊ लागले आहेत, एवढेच नव्हे तर वनस्पतिशास्र यांवरही पाश्चिमात्य ग्रंथाच्या साहाय्यानें इकडे ग्रंथ होऊं लागले आहेत. या सर्व ग्रंथांतून आलेली परिभाषा एकवट करून पुढचा प्रगतीचा मार्ग दाखविणें, हें भाषेच्या खच्या हितचिंतकाचे कर्तव्य होय; आणि तें काम प्रो. रानडे यांनीं मोठासा आश्रय नसतांही केवळ आपल्या हिंमतीवर अंगावर घेतले हैं त्यांस भूषणावह आहे. मराठी भाषेची वाढ अद्याप पुरी झाली नसल्यामुळे हा केोश आणखी २५॥३० वर्षानीं पुन्हां सुधारावा लागेल हें उघड आहे. पण तेवढ्यांनै प्रो. रानडे यांच्या ग्रन्थाची योग्यता कमी होत नाहीं. करितां मराठी भाषेच्या हितचितकांकडून त्यांच्या परिश्रमाचे चांगलें चीज होईल, अशी आम्हांस आशा आहे. कॅडी व मोलस्वर्थ याचे कोश जेव्हां बाहेर पडले तेव्हां त्यास सरकारचा आश्रय होता, तशा प्रकारचा आश्रय हल्लींच्या ग्रंथास मिळणें अगदीं योग्य आहे. पण हल्लींची परिस्थिती लक्षांत आणतां केवळ त्याच्यावरच अवलंबून राहाणें बरोबर होणार नाहीं हें आम्हीं सांगावयास नको. कसेंही असो; एवढी गोष्ट निश्चित आहे की, महाराष्ट्र भाषेच्या हितचिंकांनीं उदार आश्रय देऊन हें काम तडीस नेणें जरूर आहे. सुपररॉयल अष्टपत्री साच्याच्या १४०० पानांची कोश वगणीदारांस १० रुपयांत मिळेल हा कांहीं लहानसहान लाभ नव्हे. कांहीं उदार गृहस्थांनीं शंभर शंभर रुपये पहिल्यानें कर्जाऊ देऊन त्या कृत्यास आश्रय दिला आहे. परंतु एवढा ग्रंथ छापण्यास सुमारें १५००० रुपयांहून अधिक खर्च येणार असल्यामुळे यापेक्षां जास्त आश्रय मिळणें जरूर आहे, व तो मराठी भाषेच्या हितचिंतकांकडून प्रो. रानडे यांस मिळेल अशी आम्हांस पूर्ण उमेद आहे. अशा प्रकारची मोठीं कार्मे चांगल्या आश्रयाखेरीज होत नसतात, हें आम्हीं सांगावयास नको. व आम्हांस अशी आशा आहे कीं, प्रत्येक इंग्रजी मराठी जाणणारा या बड्या कोशाची एक प्रत घेऊन महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस मदत केल्याचे श्रेय घेतल्यावांचून राहणार नाहीं. स्वभाषेच्या अभिवृद्धीस मदत करणें म्हणजे पुष्कळ अंशीं स्वदेशाच्या अभिवृद्धीस मदत करण्यासारखेच आहे, हें आम्हीं सांगावयास नको.