पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

aくo लो० टिळकांचे केसरीतील लेख करावें, त्याचा खर्च कोणी द्यावा आणि त्यांनी केलेला निकाल अमलांत येऊन त्याचा सर्वत्र प्रचार होण्याची खटपट कोणी करावयाची हाच काय तो मुख्य प्रश्न आहे. महाराष्ट्रांत कै. बापूसाहेब कुरुंडवाडकर वगैरे कांहीं संस्थानिकांनी या बाबतीत थोडाबहुत उद्योग केलेला होता, व कै. आबासाहेब पटवर्धनासारख्यांनीही कै. केरोपंत नाना यांस साहाय देऊन नवीन पंचांगाची प्रथमतः प्रवृत्ति केली. संकेश्वरमठाचे आधिपति श्रीशंकराचार्य हेही पंचांगशोधनास प्रतिकूल नाहीत. पण हा उद्योग पुढे जितका जारीनें चालावयास पाहिजे होता तितका चालला नाहीं. कांहीं अंशीं हें काम नवीन करणग्रंथ नसल्यामुळे अडून पडल्यासारखे झाले होतें. पण तीही अडचण जर आतां दूर झाली आहे, तर आमच्यांतील कोणी संस्थानिकांनीं पुनः हें काम कां हाती घेऊं नये हें आम्हांस समजत नाहीं. निदान महाराष्ट्रांत नवीन पंचांगाचा प्रसार होण्यास फारशी अडचण पडेल असें वाटत नाही. पण त्याकरितां इकडील ज्योतिषांची एक सभा भरवून नंतर मुख्य मुख्य शहरांतील गृहस्थांची अनुमति घेऊन त्यांत जेो निकाल होईल त्याप्रमाणे पुढे काम सुरू ठेवण्यास एका स्वतंत्र कमिटीची योजना झाली पाहिजे. पुण्यासं या गोष्टीचा थोडाबहुत उपक्रम पुन्हां सुरू झाला आहे. पण सर्व ठिकाणच्या प्रमुख प्रमुख लोकांची व संस्थानिक व सरदार वगैरे श्रीमंत लोकांची मदत व अनुकूलता असल्याखेरीज हें काम कोणाच्याही हातून पार पडावयाचे नाहीं. दुसरी अशीही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, नवीन पंचांगाचा प्रसार केवळ महाराष्ट्रांतच करावयाचा आहे असे नाही, तर इतर इलाख्यांतूनही याबद्दलची चर्चा सुरू करून नवीन पंचांगाचा प्रसार केला पाहिजे. हें कार्य घडून येण्यास इतर इलाख्यांतील पुढायांचीही संमति व साह्य मिळविले पाहिजे. आणि ते दरभंगाच्या महाराजांसारख्यांनी पुढाकार घेतल्याखेरीज व्हावयाचे नाहीं. या निबधाच्या आरंभीं भारतधर्ममहामंडळसभेर्ने हा विषय घ्यावा म्हणून जी सूचना केली आहे ती एवढ्याचकरितां होय. पण ती सूचना आजच अमलांत न आली तरी महाराष्ट्रांतील लोकांनी आपला उद्योग सुरू ठेवण्यास कांहीं हरकत नाहीं. सर्व हिंदुस्थानभर शुद्ध पंचांग सुरू होणें इष्ट आहे खरें, पण ती गोष्ट आज घडून येत नाहीं म्हणून मुळींच उद्योग सोडून देणें शहाणपणाचे नव्हे. ग्रहलाघवाचा आज जो प्रचार आहे तो कहीं एकदम झालेला नव्हे. ग्रंथांचे व विषयाचे महत्त्व लोकांस समजून आल्यावर तो झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे हल्लीं ग्रंथाचाही प्रकार होईल. मात्र एकनिष्ठपणानें व मेहनत घेऊन या कामास लागणारे लोक निघाले पाहिजेत. • पुण्यांतील कमिटी तशाप्रकारें आपलें काम चालवून तिला हिंदुस्थानांतील नाहीं तरी महाराष्ट्रातील लोकांचे तरी पूर्ण साह्य मिळेल अशी आम्हांस आशा आहे.