पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ लो० टिळकांचे केसरींतील लेख जाऊं लागलें म्हणजे तें मुख्य सरकारची सत्ता कमी होऊन लयास जातें, एवढे यावरून व्यक्त होतें. हिंदुस्थानच्या बाहेरील देशाच्या इतिहासांवरून हेंच अनुमान दृढ होतें. ब्रह्मदेश व चीन या दोन्ही ठिकाणीं जातिभेद नाहीं, तथापि पहिल्याचे स्वातंत्र्य गेलें व दुस-याचे जाऊं पाहत आहे हें लक्षांत आणलें म्हणजे राज्याच्या -हासाचीं मुख्य कारणें कोणतीं व आनुषंगिक कोणतीं याचा चांगला खुलासा होतो. गुणाकडे लक्ष देऊन निरनिराळ्या जातींस एके ठिकाणीं वागविणें, मुख्य सरकारची सत्ता कायम ठेवून हाताखालील सरदारांस वरचढ होऊं न देणें, अथवा राज्याचे सर्व अवयव एकत्र राहून जुटीनें काम करतील अशी व्यवस्था ठेवणें, या राजनीतीच्या गोष्टी आहेत. त्या चांगल्या अवगत असल्यामुळेच शिवाजीमहाराज व पहिले बाजीराव यांचे कारकीर्दीत मराठेशाहीचा उत्कर्ष झाला व पुढे तिकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पेशवाई बुडाली असे म्हणणें आमच्या मतें अधिक सयुक्तिक आहे. एकदां तंटयास किंवा भांडणास किंवा फुटीस सुरवात झाल्यावर मग ती फूट जातिभेदाच्या रूपानें आमच्यामध्यें अधिक लौकर बाहेर येते, निदान त्याला तशा प्रकारचे स्वरूप येतें एवढेच जर न्यायमूर्तीचे म्हणणे असेल तर त्यावर फारसा आक्षेप येणार नाहीं; पण पेशवाई बुडण्याच्या प्रमुख कारणांपैकीं जातिभेद हें एक कारण असावें असें जर त्यांचे म्हणणे असेल तर तें बरोबर नाहीं असें आमचे मत आहे. हल्लीं ज्याप्रमाणें इंग्रजसरकारच्या वरिष्ठ कौन्सिलांतून राज्यरक्षणाच्या उपायांचा सदोदित सारखा खल चालत असून राज्यरक्षणाकरितां बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासही राज्यातील सर्व अधिकारी तयार असतात, तशाप्रकारचे पेशवाईतील सर्व अधिकाच्यांस वळण मिळाले नव्हतें, व नाना फडणविसासारख्या ज्या एक दोन गृहस्थांच्या डोक्यांत अशा प्रकारच्या कल्पना होत्या त्यांचे दरबारांत असार्वे तितकें वर्चस्व नव्हर्ते, आणि ज्यांच्याशीं टक्कर द्यावयाची ते राजनीतींत अधिक धूर्त, वाकबगार व कसलेले होते हें पेशवाईच्या व्हासाचे आमच्या मतें खरें कारण होय. राज्याच्या हिताकरितां स्वहित सोडून पाहिजे तें करण्यास तयार होणें हें जें राज्यरक्षणाचे मुख्य तत्त्व तें त्या वेळच्या मुख्य मुत्सद्यांत जितकें जागृत असावयास पाहिजे होतें तितकें नव्हतें. पुढे मार्गे कांहीं कालानें कदाचित् हीं तत्त्वें त्यास अवगत झाली असतीं पण तत्पूर्वीच ईश्वरी सतेनें वर सांगितल्याप्रमाणें चमत्कारिक प्रसंग आल्यामुळे पेशवाई लयास गेली. सर्व प्रकारच्या लोकांस एकत्र धरून ठेवण्याची कला हिंदूस अगर मुसलमानांस अवगत होती, हें शिवाजी किंवा अकबर यांच्या उदाहरणांवरून चांगलें दिसून येतें. आमच्या इतिहासांतील उणपणा काय तो हाच कीं हें धोरण राजनीतींतील प्रमुख तत्त्व समजून सर्व मुत्सद्याचे सर्वकालीं तिकडे लक्ष रहावें अशा प्रकारची व्यवस्था अमलांत न येतां हें शहाणपणाचे धोरण कांहीं विशिष्ट व्यक्तींच्या कारकीर्दीतच अमलांत राहिले. मराठी किंवा मुसलमानी राज्याचा व्हास आणि इंग्रजांचा उत्कर्ष यांची परस्पर तुलना करून जर कांहीं बोध घेण्याजोगी गोष्ट असली तर ती हीच होय.