पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल-हायस्कुलांतील शिक्षणक्रम ७७

उणीव दूर करण्याचा फीमेल हायस्कुलाच्या उत्पादकाचा मुख्य उद्देश असावा असें आम्हांस वाटतें; व हाच जर त्यांचा उद्देश असेल तर तो योजिलेल्या उपायानी कितपत सिद्धीस गेला हे पाहणे असल्यास या हायस्कुलात अशा त-हेच्या हिंदुविवाहित स्त्रिया किती आहेत हेंच आपणास पाहिलें पाहिजे. अशा त-हेची माहिती व्यवस्थापकानी दिली नाहीं, पण एकंदर विवाहित स्त्रियाची संख्या २०; पैकी जर इतर धर्माच्या म्हणजे यहुदी वगैरे स्त्रिया वजा केल्या तर आपणास या स्कुलापासून किती उपयोग होतो याची वाचकास कल्पना येईल. हे असें का व्हावें याचा विचार करिता आम्हास असे वाटतें कीं, या हायस्कुलाच्या व्यवस्थापकानी सध्याच्या समाजस्थितीचा नीट विचार न करिता दहापाच 'काल्पनिक सुधारणा' एकदम करण्याच्या आतुरतेने या स्कुलाची अशी स्थिति करून सोडली आहे. हे म्हणणे कित्येक भाविक जनास धार्ष्ट्याचे वाटेल खरे, पण प्रसंगी असे स्पष्ट व्हावेच लागतें. हायस्कुलातील शिक्षण प्रायमरी शिक्षणाचा जरी उत्तरभाग आहे, तरी या उत्तरशिक्षणाचा प्रायमरी शिक्षणाप्रमाणे स्त्रियास सार्वत्रिक उपयोग होत नाहीं, ही गोष्ट या स्कुलाच्या व्यवस्थापकानी ध्यानात ठेवण्यास पाहिजे होती ती त्यांनी ठेविली नाही असे आमच्या दृष्टीला दिसते. इंग्लडासारख्या देशात काही स्त्रिया पुरूषाप्रमाणे स्वतंत्र धंदे करण्याकरिता या उत्तर शिक्षणाची अपेक्षा करितात व पुढें पुरूषाप्रमाणें वकिलीचा, वैद्याचा, एडिटराचा, किंवा कारकुनीचा म्हणा त्या धंदा करू लागतात. स्रियानी अशा त-हेनें पुरुषाप्रमाणे स्वतंत्र धंदे करून त्यानी पुरूषाच्या दास्यातून मुक्त होऊं नये असे आम्ही बिलकुल म्हणत नाही. तथापि हा वर्षशतकाचा किंवा सहस्राचा प्रश्न आहे. जेथें प्रौढविवाह जारीनें चालतात, आणि विवाहसंबंध बहुतेक कराररूपी झाला आहे, अशा पाश्चात्य राष्ट्रातही स्त्रियानी स्वतंत्र धंदे करण्याचा प्रचार नुक्ताच सुरू झाला असून तेथें देखील फेमेल कॉलेजाची स्थापना किंवा पुरूष कॉलेजात त्याचा प्रवेश गेल्या पाचपंचवीस वर्षातच झाला आहे. आमच्या सुधारकास ही गोष्ट ठाऊक नसेलशी नाहीं. परंतु त्याना तिकडील सुधारणेच ताजे लोणी एकदम चाटण्याची अत्युत्कट इच्छा उत्पन्न झाली असावी. ए-हवी फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम ठरविताना त्यानीं या दोनही उद्देशाचा असा घोटाळा केला नसता. स्त्रियास पुरुषाप्रमाणें कारकुनीचा किंवा ग्रंथकारांचा वगैरे धंदा जर कर्त्यव्य असेल तर हल्ली प्रसिद्ध झालेला शिक्षणक्रम योग्य आहे. पण स्त्रीजातीचा ज्यास यत्किंचित् अभिमान आहे तो आमच्याप्रमाणेच परकीय प्रभूंच्या लाथा खाण्यास आमच्या स्त्रियानीं तयार व्हावे असें कदापि म्हणणार नाहीं. शिवाय आमच्याकडची समाजस्थिति मनात आणिता गृहकृत्ये सोडून स्त्रिया स्वतंत्र धंदा करूं लागण्यास अजून कित्येक शतकाचा अवधि आहे. गृहकृत्याचे ओझे जिच्यावर पडत नाहीं अशी एखादी श्रीमंत स्त्री आजही पुरूषाप्रमाणे शिकून ग्रंथकार होण्याची इच्छा धरील; पण श्रीमंती व उद्योग याचा