पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचें अपूर्व युक्तिचापल्य ६३

"स्त्रीस बारीक काठीनें किंवा दोरीनें राजाने शासन करावे." असें जें मनूनें सांगितले आहे त्याचा अर्थ काय? शिवाय पितापुत्र, गुरूशिष्य, धनीचाकर, पतिपत्नी, हे आपले धर्म पाळणार नाहीत तरही त्यांस राजदंड आहे तो कसा पडणार ? तेव्हां पतिपत्नींचा व्यवहार होतो हे अगदीं उघड आहे; व हाच पक्ष मयूखवीरमित्रोदयकारादि ग्रंथकारांस मान्य आहे.

पतित्यागास राजदंड आहे.

एवढ्यावरून स्त्रीपुरूषांची परस्परावर फिर्याद चालते असें सिद्ध झालें. आतां मागें सांगितलेल्या चार कारणाखेरीज जर स्त्री पुरूषाचा त्याग करील तर त्यास स्मृतिकार काय दंड सागतात तो पहा. प्रत्येक स्मृतीचे आचार, व्यवहार व प्रायश्चित्त असे तीन विभाग असतात. आचारांत विवाहादि संस्काराचा अंतर्भाव होतो. व्यवहार म्हणजे दिवाणी व फौजदारी काम चालविण्याची रीति. यातच गुन्हे व त्याची शासने दिली असतात. हल्ली ज्याप्रमाणे दिवाणी व फौजदारी कोर्टे निरनिराळी आहेत व दोन्हीचें काम चालविण्याचे कायदेही निरनिराळे आहेत, तशी पूर्वी व्यवस्था नव्हती. एका व्यवहाराध्यायातच मुदतीच्या, पुराव्याच्या व कंट्राक्टच्या कायद्याचा, पिनलकोडचा आणि दिवाणी व फौजदारी काम चालविण्याच्या कायद्याचा समावेश होत असे. कोणत्याही स्मृतींतील व्यवहाराध्याय वाचला असता असें दिसून येईल की प्रथमत: कोर्टाची रचना, मुदत व पुरावा याचा विचार झाल्यावर मग व्यवहार किती प्रकारचा होतो हें सागून त्या प्रत्येक प्रकरणाचा विचार स्मृतिकारानी केला आहे. फिर्याद अठरा प्रकारची संभवते असे मनूनें व इतर स्मृतिकारानीं सागितले आहे. या अठरा प्रकारांतच--दायभाग, ऋणादान वगैरे दिवाणी व चोरी, साहस वगैरे फौजदारी प्रकरणें येतात. यातील साहस, पारूष्य, वगैरे प्रकरण प्रस्तुत आपल्या विषयास लागू असल्या कारणाने त्याचाच येथे विचार करूं. इतका विस्तार करण्याचें कारण इतकेच कीं आमच्या स्मृतिग्रंथातील व्यवस्थेची वाचकांस थोडी माहिती व्हावी व आम्ही कोठलीं तरी कोनाकोप-यातील वचने काढतों असा जो आमच्यावर आक्षेप आहे त्याचें खरें स्वरूप वाचकांचे नजरेस यावें. व्यवहाराध्यायात फिर्यादीचे म्हणजे आतांच्या कायद्याप्रमाणे गुन्ह्यांचे जर असे नीट वर्गीकरण केलें आहे व त्यापैकीं एका वर्गात म्हणजे साहसांत जर स्मृतिकारांनी पतीचा त्याग करणा-या स्त्रीस शिक्षा सागितली आहे, तर अशा गुन्ह्यास जुन्या शास्त्रांत राजदंड नाहीं असें म्हणणें म्हणजे साहस नव्हे काय ? रा.ब.स आम्ही असें विचारतों कीं पिनलकोडाच्या अमक्या चाप्टरच्या अमक्या कलमाखाली अमुक एक अपराध स्पष्ट येतो असें जर त्यांस कोणी दाखविलें तर ते त्याचा अर्थवाद करून आडरानांत शिरतील काय? नाही; तर मग व्यवहाराध्यायातील अठरा प्रकारच्या व्यवहारांपैकीं साहसाच्या सदराखालीं जर पतीचा त्याग करणा-या स्त्रीस स्पष्ट शिक्षा सांगितली