पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य ५९

शास्त्रांत शिक्षा नाहीं असा रा.ब.चा अभिप्राय आहे. यावर प्रथमत: रा.ब.स आमचा असा प्रश्न आहे कीं, "अधिवेदन" या शब्दाचा अर्थ त्यानीं टीकेत किंवा कोशांत काढून पाहिला होता काय? तो पाहिला असतां तर रा.ब.स आपली चूक तेव्हाच कळून आली असती. पण पूर्वाग्रहामुळें आपण अज्ञात भूमीवर संचार करीत आहों हें रा.ब.च्या लक्षात आले नाहीं; व त्यामुळेंच त्यांनीं ही अंधारात उडी घेतली असावी ! ए-हवी संस्कृताचें यत्किंचित् ही ज्यास ज्ञान आहे किंवा निदान आपणांस फारसें संस्कृत येत नाहीं असें तरी ज्यास पूर्ण ठाऊक आहे त्याच्या हातून असला प्रमाद कधींही झाला नसता ! अधिवेदन शब्दाचा वास्तविक अर्थ "एक बायको जिवंत असतां दुसरा विवाह करणे" असा आहे. वेदन हा शब्द (विद्) लग्न करणें या धातूपासून आला असून अधि (अधिक) वेदन म्हणजे एक स्त्री असता दुसरे लग्न करणें होय. विज्ञानेश्वरांनीं "अधिवेदनं भार्यान्तरपरिग्रह:" अशी स्पष्ट व्याख्या केली आहे. अधिवेदनाचा हा अधिकार पुरूषासच आहे, स्त्रियांस नाही; व पुरूषांसही कांहीं नियमित कारणाकरिताच तो अधिकार दिला आहे. मनूने म्हटलें आहे:-

मद्यपा साधुवृत्ता च प्रतिकूला च या भवेत्
व्याधिता वाधिवेत्तव्या हिस्त्रा र्थघ्नी च सर्वदा |
वंद्याष्टमिधिवेद्याब्दे दशमे तु मृतप्रजा
एकादशे स्त्रीजननी सद्यस्त्वप्रियवादिनी |
या रोगिणी स्यात्तु हिता सपन्ना चैव शीलत:
सानुज्ञाप्याधिवेत्तव्या नावमान्या च कर्हिचित् |

म्हणजे जर पहिली बायको दारूबाज, वाईट चालीची, द्वाड, रोगी किंवा उधळी असेल तर पुरूषानें दुसरा विवाह करावा. वाझ असल्यास आठ वर्षांनीँ, मुले वाचत नसल्यास दहा वर्षानीं, मुलीच होत असल्यास अकरा वर्षांनी व अप्रिय बोलणारी असल्यास लागलीच पुरूषानें दुसरा विवाह करावा रोगी असून अनुकूल व सुशील असल्यास तिच्या परवानगीने विवाह करावा व तिचा कधी अवमान करूं नये. याज्ञवल्क्यानीही असेंच सागितलें आहे:-

सुरापी व्याधिता धूर्ता वध्यार्थघ्नप्रियंवदा
स्त्रीप्रसूश्चाधिवेत्तव्या पुरूषद्वेषिणी तथा |

यावरून उघड होतें की ज्याअर्थी पुत्रोत्पादन व धर्मार्थकामाची वृद्धि हा लग्न करण्याचा मुख्य हेतु शास्त्रांत मानिला आहे त्याअर्थी पहिल्या बायकोस पुत्र होण्याचा किंवा तिच्यापासून संसारत नव-यास सुख होण्याचा जेव्हा संभव नसतो तेव्हां शास्त्रानें त्यास दुसरें लग्न करण्याची मोकळीक दिली आहे. तथापि पहिल्या बायकोस (ती अनुकूल असल्यास मनूप्रमाणें चांगलें, नसल्यास निदान पोटापुरतें तरी) अन्नवस्त्र त्यास दिलेंच पाहिजे.