पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर यांचे अपूर्व युक्तिचापल्य

अशी मनुस्मृति आहे. रोमन व इंग्रज लोकांचे प्राचीन कायदेही असेच होते. तेव्हां आमच्या धर्मशास्त्रावरील ग्रंथकारांची सरणी सोडून देऊन अर्वाचीन ऐतिहासिक सरणी जरी घेतली तरीही "न स्त्री स्वातंत्रमर्हति" याचा अर्थ आम्ही वर दिल्याप्रमाणें करावा लागतो. त्यास गत्यन्तर नाहीं.

व्यभिचार.

रा.ब. चा दुसरा मुद्दा असा आहे की, व्यभिचारास शास्त्रात अगदी अल्प शासन सागितले आहे त्यावरून स्त्रियास पूर्वी पुष्कळ स्वातंत्र्य होते असे अनुमान होते. पण हा पक्षाभास आहे; म्हणजे, रा.ब.नी व्यभिचारास शासन कमी आहे असें जें म्हटलें आहे तोच प्रमाद आहे. मनूंत जर : -

अन्योन्यस्याव्यभिचारो भवेदामरणान्तिक :
एष धर्म समासेन ज्ञेय: स्त्रीपुंसयो: पर : |
तथा नित्यं यतेयातां स्त्रीपुंसौ तु कृतक्रियौ
यथा नाभिचरेतां तौ वियुक्तावितरेतरम् |

याप्रमाणें स्त्रीपुरुषानी नित्य एकमतानें राहिलें पाहिजे; आणि तसेच जी स्त्री -

पतिं या नाभिचरति मनोवाग्देहसंयता
सा भतृॆलोकानाप्नोति सद्भि: साध्वीति चोच्यते |

काया-वाचा-मनेकरून व्यभिचार करणार नाहीं तीच साध्वी असे सांगून मानस-व्यभिचाराचा देखील निषेध केला आहे, तर तोच मनू व्यभिचारास कमी दंड कसा सागेल बरें ! दंडाचे तीन प्रकार आहेत -- धर्मदंड किंवा प्रायश्चित्त, लोकदंड, आनि राजदंड. व्यभिचारिणीस भ्रूणहत्येचें पाप लागतें अशी श्वेतकेतूची मर्यादा मागें दिलीच आहे. आता मनू काय म्हणतो ते पाहा:-*

व्यभिचारात्तु भर्तु: स्त्री लोके प्राप्नोति निंद्यता
शृगालयोनिं प्राप्नोति पापरोगैश्च पीड्यते |

हा लोकदंड झाला, दुसरा धर्मदंड प्रायश्चित्तप्रकरणांत मनूने दिला आहे:--

विप्रदुष्टां स्त्रियं भर्ता निरूंद्यादेकवेश्मनि
यत्पुंस: परदारेषु तच्चैनां चारयेद्व्रतं|

याची कुल्लूक भट्टानी अशी व्याख्या केली आहे की, "व्यभिचारिणी स्त्रीस घरांतच एका कोठडींत कोंडून ठेवावी व पुरुषास आपल्या जातीत व्यभिचार केल्यास जें प्रायश्चित्त आहे तेंचे स्त्रीस द्यावें. पुरूषाच्या निम्मे स्त्रियांस असें जें वसिष्ठादिकांनी सांगितले आहे तें स्त्रीची इच्छा नसतां व्यभिचार घडल्यास समजावे.