पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

प्रश्न आहे यासंबंधानें बाकीच्या गोष्टींचा विचार मागे वेळोवेळी आम्हीं केलाच आहे, व पुढेही जरूर पडल्यास केला जाईल.

प्रमाणग्रंथ व त्यांची सरणी

रा. ब. नीं धर्माशास्त्रावरील प्रमाणग्रंथ आपणास कोणते मान्य आहेत हें सागितलेच आहे. मनु, याज्ञवल्क्य (स्मृतिकार), कुल्लूक, विज्ञानेश्वर(‌टीकाकार) आणि नीलकंठादि (निबंधकार) हे त्यास प्रमाण आहेत. तेव्हा त्याबद्दल मुळीच वाद नाहीं. वेद सर्व धर्मग्रंथाचे मूल, परंतु प्रस्तुत प्रकरणाचे त्यात विवेचन नसल्यामुळे ते येथे सोडून देण्यास कांही हरकत नाहीं. बाकी शिल्लक राहिला देशाचार म्हणजे देशरिवाज. हाही स्मृतिग्रंथारून प्रमाण धरिला आहे. पण रा.ब. च्या पक्षास ही गोष्ट अनुकूल नाही म्हणून ते असे प्रतिपादन करितात की-

यस्मिन् देशे य आचारो व्यवहारकुलस्थिति:
तथैव परिपाल्यो सौ यदा वशमुपागत: |

असें जे राजानें आचार पाळावा म्हणून वचन आहे तें जिंकलेल्या राष्ट्राबद्दल आहे. स्वराष्ट्रात आचार जर शास्त्राविरूद्ध नसेल तरच प्रमाण मानावा. उदाहरणार्थ, प्रस्तुत प्रकरणीं नेटिव्ह संस्थानांतून जो आचार आहे तो शास्त्रविरुद्ध नसल्यास प्रमाण समजावा, पण हा रा. ब. चा कोटिक्रम व्यर्थ आहे. कारण जरी वरील वचन जिकलेल्या राष्ट्राबद्दल आहे तरी स्वराष्ट्रातील आचार (मग तो शास्त्रसुद्ध असो वा विरूद्ध असो) ह्याचप्रमाणें मान्य करावा अशाबद्दल स्मृतिग्रंथातून दुसरीं पुष्कळ वचने आहेत. वेद: स्मृति: सदाचारो स्वस्य न प्रियमात्मन: | अशी जी चार धर्माची मूळें मनूंत सागितलीं आहेत त्यात 'सदाचार' आहे. सदाचाराची व्याख्या चतुर्विशति मताप्रमाणे -

यस्मिन् देशे य आचार: पारंपर्यक्रमागत:
वर्णाना किल सर्वेषा स सदाचार उच्यते |

अशी आहे. म्हणजे ज्या देशात जो आचार ऊर्वापार चालत आला आहे तो सदाचार म्हणावा. हा शास्त्रविरूद्ध असला तरी प्रमाण आहे.

अद्यदाचर्यते येन धर्म्य वा धर्म्यमेव वा
देशस्याचरणं नित्यं चरित्रं तद्धिकीर्तितम् |

अतएव देशाचार धर्म्य असो व अधर्म्य असो, तो अवश्य पाळला पाहिजे. वस्तुत: प्रथम आचार व मागून ग्रंथ "आचारसंभवो धर्म:" असें वचन आहे. म्हंणून स्मृतीचा व आचाराचा विरोध आल्यास आचारच प्रधान मानावा.