पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता १९

बायकोवर किंवा पुत्रावर जे प्रेम असतें, तें त्यांच्या केवळ उपायोगावरच नसतें; मग वरील प्रेमास विषयभूत असा एखादा प्रतिनिधि त्यानें पाहिल्यास त्यास आपण काय म्हणून दोष ठेवावा? भूक, तहान, वगैरे शरीरविकारांचे ज्याप्रमाणें अन्न, जल वगैरे विषय आहेत, त्याचप्रमाणें मानसिक विकाराचेही विषय असतात; व पुत्रप्रेम हा त्यांमधील एक असल्यामुळे, औरस पुत्र नसल्यास त्याची जागा अन्योपायांनी भरून काढणें जरूर आहे.

          वरील शंका प्रथमदर्शनी अगदीं अनिवार्यशी दिसते; पण जरा नीट नजर दिली म्हणजे त्यांतील छिद्रें आपणांस दिसूं लागतात. शरीर ज्या द्रव्यांनी घडले आहे, ती शरिरातून पुन: आपल्या पूर्व स्थितींत रोज जात असतात. एखादा मनुष्य एक मैलभर चालला तर त्याच्या स्नायूंचा थोडाबहुत व्यय हा व्हावयाचा व हाच प्रकार बोलणें, हसणें, ऐकणे वगैरे हरएक क्रियेविषयीं समजावयाचा. दर मिनिटास किवा पळासही आपल्या शरीरातील काही द्रव्यांचा व्यय होतच असतो. शरीर कायम ठेवणें असल्यास, तो आपल्यास भरून काढला पाहिजे. शरीरास असा व्यय नसता, तर कोणासही भूक व तहान लागतीना, व सर्व मनुष्यें अमर राहिलीं असती. सारांश, भूक व तहान जी आपण अगदी साहजिक समजतो, तीं वरील घडामोडीवर अवलंबून असतात. त्याचा व इतर मनोविकाराचा उगाच संबंध जोडण्यार हशील नाहीं. आपल्या पुत्रावर आपण जें प्रेम करितों, त्यास व्यक्त म्हणजे ज्याचा उपयोग ढळढळीत नजरेस येतो अशा कारणाखेरीज दुसरी अनेक कारणे असतात हें आम्हास अगदी मान्य आहे. सहवास आपलेपणाचा अभिमान, किंवा दोघाची शरीरें एकाच हाडामासाची असल्यामुळे, समान द्रव्यामध्यें असणारें साहजिक आकर्षण वगैरे काहीं म्हटलें, तरी त्या प्रेमाचें पूर्ण कारण कळेलसें वाटत नाही. तथापि तेवढ्यानें वरील आक्षेप कसा सिद्ध होतो, हें आम्हास कळत नाही. पितापुत्रास जोडणार संबंध वाचेस जरी अदृश्य असला, तथापि या संबंधाचे अस्तित्व किंवा अभाव, दोहोंपैकीं एकाच ठिकाणी कसा कल्पावयाचा ? लोहचुंबक लोहाकर्षण करितो हें खरें; तथापि हा गुण लोखंडाचा, का लोहचुंबकाचा व तो अन्यनिरपेक्ष असूं शकेल, कीं नाही, वगैरे प्रश्न ज्याप्रमाणे वायफळ आहेत, त्याचप्रमाणें पुत्रप्रेमासंबंधीं वरील प्रश्न होय. बापाचे पोटच्या मुलावर प्रेम असतें, तथापि ते मुलाखेरीज व्यक्त करावयाचें नाहीं. तत्पूर्वी तें प्रेम असतें, याचा अर्थच आम्हांस समजत नाहीं. तात्पर्य, मनुष्यास मुलगा झाला म्हणजे त्याच्यावर त्याची प्रीति जडते, परंतु ही प्रिति पुत्रेच्छेस कारण होत नाही. शिवाय औरस पुत्रापासून जें समाधान व सुख होतें, तितकें दत्तकापासून कधींही होत नाहीं, व होणार नाहीं. अगदीं तान्हें मूल घेऊन जरी आपण वाढविलें व पुढें दत्तकही घेतलें तथापि तें लोकांचें आहे, ही कल्पना मनांतून निघत नाहीं व सुख पुष्कळ अशी कल्पनेवरच असतें; तेव्हां या नजरेनें पाहिले तरी दत्तक गौणच पडतो. उघडच आहे पोटच्या गोळ्यावरील प्रेम कोठें व उगीच लावालावींचें कोठें?