पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ लो. टिळकांचे केसरींतींल लेख

व तदनुरूपच वरील श्लोकातही मनूनें दोनही हेतु एकाच ठिकाणीं दिले आहेत. या दोनही कारणाचा आजच्याच अंकात विचार व्हावयाचा नाहीं; करितां व्यावहारिक हेतु-म्हणजे नाव चालविणें याचा विचार पुढील खेपेवर टाकून पहिल्याच कारणाचा विचार करूं. दत्तक घेतल्याने आपलें श्राद्ध, क्रिया वगैरे करण्यास आपण एक अधिकारी करून ठेवितों, व पुत्रप्राप्तीपासून जें स्वर्गसुख तेंही आपणांस प्राप्त होते, हें जरी सर्वथैव खरें आहे, असें मानिलें, तरी तेवढ्यावरूनच स्वर्गप्राप्तीस व पिंडोदक देंण्यास दत्तकाख्रेरीज उपायच नाही, असा सिद्धांत करितां येत नाहीं. दत्तकाने अमुक एक कार्य होतें असें जरी मानिले, तरी तेवढ्यानेच तें कार्य् दत्तकावांचून होत नाहीं, असा अर्थ निघत नाहीं. जेथें जेथें धूर असतो तेथें तेथें अग्नि असतो, हें वाक्य जरी खरें आहे, तरी त्याच्या उलट म्हणजे जेथें अग्नि तेथें धूर हे वाक्य खरे नाहीं. पण इतकेंही दूर जावयास नको. पुत्राचें (मग तो दत्तक असो वा औरस असो) तोंड पाहिल्याखेरीज जर स्वर्ग मिळत नाही, तर जगद् गुरू शंकराचार्यांची वाट काय? तुकारामबुवा कुठें आहेत? व वामनपंडिताच्या 'अजित नाम घडो भलत्या मिषें' या सूत्राचें काय करावयाचें ? या गोष्टी मनांत आणल्या म्हणजे पुत्रोत्पादन हा स्वर्गप्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी एक आहे येवढेच मात्र म्हणावे लागेल; व वास्ताविक प्रकारच असा आहे. आमच्या शास्त्रकारांनी स्वर्गाची वाट अगदी सुलभ करून ठेविली आहे. दान, तीर्थयात्रा, पुराणश्रवण, ब्रम्हचर्य, योगाभ्यास, मठ, किंवा देवालयें बांधणें, भगवन्नामकिर्तन व श्रवण वगैरे पुष्कळ गोष्टी पुत्रोत्पादनाप्रमाणेंच स्वर्गप्राप्तिकारक आहेत, असें श्रुतिस्मृतिपुराण-ग्रंथांचे साधारण मत आहे. सगळ्या अठरा पुराणांचे सार "परोपकार: पुण्याय:" या वाक्यात कोंदले आहे. असें असता दत्तकात विशेष काय ? कोणी असें म्हणतील, कीं वर सागितलेले उपाय संकटसमयी आहेत. त्यास उत्तर हेंच कीं दत्त-


    *धर्मग्रंथारून या अर्थाची पुष्कळ वचनें आहेत, पैकीं काहीं येथें देतो:- ऋग्वेद १०, १४, ८ यात 'संगच्छस्व पितृभि: संयमेनेष्टापूर्तेन परमे व्योमन्' म्हणजे धर्मशाळा वगैरे बाधल्याने स्वर्गप्राप्ति होते असें दिले आहे. याज्ञवल्क्यस्मृतींत 'तेनाग्निहोत्रिणो याति स्वर्गकामा दिवं प्रति | ये च दानपरा: सम्यगष्टाभिश्च गुणैर्युता: | तेपि तेनैव मार्गेण सत्यव्रतपरायणा:' अशीं वचनें आहेत. दुसरे 'न्यायागतधनस्तत्त्वज्ञाननिष्ठोतिथिप्रिय: श्राद्धकृत्सत्यवादी च गृहस्थोपि च मुच्यते' | स्कांदपुराणात - 'कृत्वा मठं प्रयत्नेन शयनासनसंयुतं | पुण्यकाले द्विजेभ्यो वा यतिभ्यो वा निवेदयेत् | सर्वान् कामानवाप्नोति निष्कामो मोक्षमाप्नुयात् |' असें स्पष्ट आहे. यावरून वाचकांच्या दुसरें असें लक्षांत येईल, कीं वरील वचनात दत्तकाच्या अभावीं हे उपाय आहेत असें कोठेंही सांगितलें नाहीं. वस्तुत: दत्तकाहूनही स्वर्गप्राप्तीचे हे अधिक श्रेयस्कर मार्ग आहेत.