पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१२
लो. टिळकांचे केसरींतील लेख

कशा प्रकारच्या आहेत, व त्या सोडाण्यास ते कितपत तयार असतात, वगैरे गोष्टींचें निरूपण केलें. आता मागें सांगितल्याप्रमाणें या विषयाच्या पहिल्या भागाकडे, म्हणजे धर्मदृष्ट्या या संस्काराची कितपत जरूर आहे, या मुद्दयाकडे वळूं.
 धर्मशास्त्रावरील जुने ग्रंथ पाहिले तर असें दिसून येईल, कीं फार प्राचीन काळीं दत्तकाचा प्रघात हल्लीं आहे तितक्या जारीनें सुरू नव्हता; किंबहुना त्यास मुळीच महत्त्व नव्ह्तें, असें म्हटलें असता चालेल. दत्तकावर-हल्लीं जेवढे म्हणून उपलब्ध ग्रंथ आहेत तेवढ्या सगळ्यातून दत्तकसंस्काराचें मूळ म्हणून, जी वचनें दिली आहेत, ही सर्व स्मृतिग्रथातून घेतली आहेत. आतां येवढ्यावरून स्मृतिकारांपूर्वी दत्तकसंस्कार नव्हता, असे अनुमान करतां येत नाही हें खरें, तथापि स्मृतिकारापूर्वी या संस्कारास विशेष महत्त्व नव्हतें असें म्हणण्यास कांही हरकत दिसत नाही. वेदातून "नापुत्रस्य लोको स्ति" "पुत्रेण लोकान् जयति" "एप वा अनृणो य: पुत्री" वगैरे 'पुत्राने स्वर्गप्राप्ति होते,' 'पुत्रानें पितरांचे ऋण फिटते' इत्यादि अर्थाची वाक्यें सापडतात. परंतु मनु, याज्ञवल्क्य वगैरे स्मृतींतून 'अमक्यानें दत्तक घ्यावा,' 'अमक्यानें घेऊं नये,' 'एकच मुलगा असल्यास दत्तक देऊं नये,' वगैरे जे नियम आढळतात ते वेदात दिले नाहीत. शिवाय स्मृतिकारानी नापसंत केले असते, असे दत्तक झाल्याची उदाहरणेंही वेदांत सापडतात. विश्वामित्राने आपले शंभर पुत्र हयात असतांनी शुन:शेपास आपला पुत्र केल्याची कथा ॠग्वेदात आहे, व यजुर्वेदांत अत्रि ऋषीनें आपले सर्व मुलगे और्वऋषीस दिल्याचें सागितले आहे. *सदरहू दोनही उदाहरणें मन्वादि शास्त्रकाराच्या मते अशास्त्र आहेत. मग आमच्या बादशाहिणीच्या नामदार कोर्टात खटला येता, तर त्याचा वेस्ट्राप ऋषीनीं काय निकाल केला असता, हे सागावयास नकोच ! कलियुगात औरस पुत्राची जागा भारण्यास दत्तकाखेरीज जसा दुसरा उपाय नाही, तशी पुर्र्वी स्थिति नव्हती. धर्मग्रंथातून औरस पुत्रासुद्धा एकंदर बारा+ प्रकारचे पुत्र सागितले आहेत, व कलियुगापूर्वी ते सर्व प्रचारात असत; त्यामुळें हल्लीइतकी पूर्वी दत्तकावरच झोड पडत नसे, हे स्वाभाविकच आहे. वेदात तरी दत्तकाची विशेष प्राबल्य नसण्याचें मुख्य कारण हेंच असावें,



 *रावसा. मंडलिककृत इंग्रजी हिंदुधर्मशास्त्र पाहा. या ग्रंथांत या प्रकरणाचा चांगला विचार केला आहे. रावसाहेबाच्या मते ह संस्कार खरोखर अनवश्यक असून त्यास हल्लीं उगीच आवश्यक मानतात. या निबंधांतील बराच भाग सदरील ग्रंथांतून घेतला आहे.

+ते बार पुत्र हे:-
                  "औरसो धर्मपत्नीजस्तत्सम: पुत्रिकासुत:
                   क्षैत्रज: क्षेत्रजातस्तु सगोत्रेणेतरेण वा
                   गृहे प्रछन्न उत्पन्नो गूढजस्तु सुत: स्मृत:
कानीन: कन्यकाजातो मातामहसुतो मत:"