पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दत्तकाची आवश्यकता

११



असें म्हणून तो नवीन प्रघात अमलांत आणणारा एखादा सांपडल्यास विरळा ! सुधारणेस जेवढे म्हणून अडथळे आले आहेत तेवढे याच कारणामुळे होत. तथापि मनुष्याच्या मनाच्या या स्वाभाविक प्रवृत्ती पासून कांहींच फायदा होत नाहीं असें म्हणता येत नाहीं.अशी प्रवृत्ति नसती तर प्रतिदिवशीं हजारों नवे फेरफार होऊन समाजाचें तारूं कोणीकडें भटकलें असतें तें सांगवत नाही. शिवाय, विचार केल्यावांचून जुनी म्हणूनच एखाद्या रीतीभातीस चिकटून राहण्याची जरी मनुष्याची प्रवृत्ति असली, तथापि त्याच्यांत विचारशक्तीचें प्राबल्य असल्यामुळें हळूहळू काही जुन्या रीति वाईट अशी त्याची खात्री करण्यास कठिण पडत नाहीं. असें नसतें तर आज ज्या शेंकडो नवीन रीति प्रचारांत येत आहेत त्या कधींही आल्या नसत्या.असो; एवढी प्रस्तावना करण्याचे कारण इतकेंच की, शिरोलेखात सागितलेल्या विषयाच्या संबंधानें चर्चा करतेवेळीं तरी (अमलात आणण्याची गोष्ट निराळी) हा प्रघात आज बरेच दिवस सुरू आहे, यापेक्षा जास्त काही आहे कीं काय, याचा विचार प्रत्येकाने शातपणे करावा. आमच्या मते तर हा संस्कार धर्माप्रमाणे आवश्यक नसून, तो ज्या वेळीं प्रचारात आला, त्या वेळीं त्यापसून जे फायदे होत होते, त्यापैकीं हल्ली एकही फायदा होत नसून, उलट त्याच्या शतपट नुकसान होत आहे. ह्यांपैकीं पहिला भाग धर्मशास्त्राचा, व दुसरा केवळ अर्थशास्त्राचाच आहे, असें म्हटलें असता चालेल. दत्तकसंस्कार धर्मदृष्ट्या अनवश्यक ठरल्यावर, मग त्यापसून व्यवहारात काय काय तोटे होतात, हे सागण्यास व समजण्यास ठीक पडेल. करिता प्रथमत: धर्मशास्त्रदृष्ट्या, याचा विचार करून, नंतर त्याच्या व्यावहारिक स्वरूपाकडे वळण्याचा आमचा इरादा आहे. शिवाय असें केल्यानें धर्मसंस्काराचा व्यवहारदृष्ट्या एकदम विचार झाल्यास वृथादर्माभिमान्याची जी फुकट काव काव होते, तीही बंद पडेल. धर्मसंबंधाने केवळ युक्तीने विचार करण्याचा प्रघात कोणत्याही देशात अजून पूर्णपणे पडला नाहीं, तथापि "स्वधर्मे निधनं श्रेय:" या गीतावाक्यास मान डोलविणा-या व कभाद, सांख्य व वेदान्त या मतांचा एकाच जातीखालीं समावेश करणा-या लोकामध्ये तो जितका असावा तितका नाहीं याचें आश्चर्य वाटतें. आम्हास आज जी उपोध्दातात एवढी जागा आडवावी लागली त्याचे तरी बीज हेंच. असो, लिहिता लिहिता हा लेख बराच लांबल्यामुळें आज दत्तकसंस्काराच्या ज्या भागाविषयी आम्हीं लिहिण्याचें योजिले होतें, तो तसाच राहिला; नंतर त्यात अर्थशस्त्राचे संबंधाने जे दोन चार मोठ्या महत्त्वाचे विचारार्ह मुद्दे आहेत त्याजकडे वळूं. या विषयावरील सर्व विचार एका निबंधांत नाहींत हें वरील प्रस्तावावरून वाचकाच्या लक्षात आलेंच असेल.

(२)


 मागील अंकीं असल्या विषयाचे संबंधानें लोकाच्या साधारण समजुती