पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१०
लो. टिळकांचे केसरींतील लेख



दत्तकाची आवश्यकता


 मागे 'न्हाणवली'वर लिहितांना आम्हीं असें लिहिलें होतें, कीं आमच्यांत धर्माच्या नांवावर पुष्कळ निरर्थक व अहितकारक चाली आल्या आहेत. मुसलमानी राज्यात धर्मशास्त्राचा बराच लोप होऊन, त्यानंतर स्वभावत:च ब्राम्हणी राज्यात त्यास फाजील महत्त्व प्राप्त झाल्यामुळे, मूळ धर्मग्रंथात ज्या संस्काराचे किंवा चालीचें विशेष प्राबल्य नव्हते, ज्या तत्कालीन लोक धर्मदृष्ट्या आवश्यक, अनित्य किंवा वैकल्पिक मानीत असत, ते संस्कार किंवा त्या चाली आमच्या अज्ञानानें व फाजील भक्तीने प्रचारांत येऊन "शास्त्रात् रुढिर्बलीयसी" या न्यायानें आज आमच्या हाडास खिळून राहिल्या आहेत. अशा रीतीभातीसंबंधाने शातपणाने विचार करण्यास किती लोक तयार आहेत, याचा प्रत्यय आमच्या वाचकास मागेच येऊन चुकला आहे. तथापि अशा गोष्टींबद्दल चर्चा कोणीतरी प्रथमत: सुरू केली पाहिजे, हे मनात आणून आज शिरोलेखात नमूद केलेल्या संस्काराविषयी दोन शब्द लिहिण्याचे आम्ही योजिले आहे. गर्भादानसंस्कार शास्त्रदृष्ट्या अनवश्यक आहे, याबद्दल आता मेषस्वभावाच्या किंवा दुराग्रही काही लोकावाचून कोणास संशय राहिला असेल, असे वाटत नाहीं. तथापि व्यवहारदृष्ट्या सदर संस्कारावर निरर्थकता व ग्राम्यता, या दोन दोषाखेरीज (हे दोष लहान आहेत असे नाही)दुसरा कोणताही आरोप ठेविता येत नाहीं. पण दत्तकसंस्काराचा प्रकार याहून फारच निराळा आहे. धर्मदृष्ट्या पुत्राचे अभावीं त्याचे काम करण्यास अनेक उपाय असता, त्यापैकीं हे 'आक्टिंग' पुत्राचाच उपाय प्रचारात आल्यामुळें, कित्येक लोकाच्या कष्टार्जित द्रव्याचा अपव्यय होऊन, आज आपल्या देशाचे कोट्यवधि रुपयाचे नुकसान होत आहे.यावरून असें कोणीं समजूं नये, की ज्या वेळेस हा प्रघात सर्वत्र सुरू झाला, त्या वेळेस व्यवहारदृष्ट्या त्याची काहीच जरूरी नव्ह्ती. कोंणत्याही राष्ट्राचा इतिहास ज्यानें अगदीं वरवर वाचिला असेल, त्यास सुद्धा असे कळून येईल कीं, धर्मात न सागितलेला, म्हणजे शुद्ध व्यावहारिक किंवा अर्धवट धर्मोक्त्त प्रघात, एकाद्या काळीं प्रचारात येण्यास त्या त्या वेळची स्थिति बरीच कारणीभूत असते. पण एकदा काहीं कारणांनी एखादी गोष्ट प्रचारात आली, म्हणजे कालातराने तीं कारणे नाहींशीं झालीं तरीही तो प्रचार सोडवत नाही. मनुष्याच्या मनाची प्रवृत्ति स्वभावत:च होतील तितके कमी श्रम करण्याकडे असल्यामुळें, एखादा चालू असलेला प्रघात आपल्यास किती हितकारक आहे, व त्याचे जागीं दुसरा एखादा प्रघात सुरू केल्यास त्यापासून आपणास काय काय फायदे किंवा तोटे होतील, याचा पूर्ण विचार करण्यास जे मानसिक श्रम लागतात,ते करण्यास फारच थोडे लोक तयार असतात व या थोड्यापैकीही, विचारातीं एखादा नवा प्रघात पूर्वीच्यापेक्षां हितकारक ठरल्यावरही,
 'पुराणामित्येव न साधु सर्वें न चापि काव्यं नवमित्यवद्यम्'