पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


बहिष्कार


व तो राजाकडे न जातां लोकांकडे आला. अशा त-हेनें राजा, धर्माध्यक्ष व लोक असे तीन निरनिराळे विभाग होऊन त्याप्रमाणेंच शिक्षेचेही झाले. इंग्लंडात पूर्वी पाद्री लोकांचा हात ज्यांत त्यांत असे; म्हणजे जातकादि संस्कारांपासून तों अगदीं वारसाची निवडानिवड होईपर्यंत. पण पुढें विद्येचा प्रसार अधिकाधिक होऊन त्यांतील बहुतेक अधिकार दिवाणी कोडतास प्राप्त झाले. कांहीं देशांत तर पाद्रीसाहेबांकडे आतां कांहीएक उरलें नाही. म्हणजे लग्नेंसुद्धा जमिनीच्या देवघेवीप्रमाणे रजिस्टर करितात; व हाच प्रकार उत्तरोत्तर इकडेही घडून येण्याची चिन्हें दृष्टीस पडूं लागलीं आहेत. पूर्वीचा प्रकार म्ह्टला म्हणजे वर सागितल्याप्रमाणें "निषेकाद्या: स्मशानांतास्तेषां वै मंत्रत: क्रिया:" हा होय. पण या षोडश संस्कारांपैकीं हल्लीँ आपण कितीसे पाळतों ? लग्न, मुंजखेरीजकरून बाकी बहुतेक नाहीसे झाले म्हटल्यास चालेल, व जे राहिले आहेत त्यांची सुद्धा कालेकरून तीच व्यवस्था होण्याचा रंग दिसत आहे. आणि इतिहासावरून पाहता या धर्मसंस्कारांच्या -हासाची प्रवृत्ति बंद करणे प्राय: दुरापास्तच होय. एकदा लोकाचे मनाचा कल कळल्यावर त्याचा प्रतिरोध करणारानें "क ईप्सितार्थस्थिरनिश्चयं मन: पयश्च निम्नाभिमुखं प्रतीपयेत्" या कालिदासोक्तीचे मनन करून मग आपल्या कार्यास लागणें उचित होय!
 येवढ्यावरून इतकें लक्षात येण्याजोगे आहे कीं, इतर राष्ट्रांप्रमाणेंच आपल्या राष्ट्राची या कलियुगांत धर्मविमुखता दृष्टीस पडूं लागली आहे, व हिचा प्रतिरोध करणेंही कठीण आहे. तर अशा वेळॅस राजकीय व धार्मिक शिक्षाचें फारखत होतांना ज्याप्रमाणें बहिष्काराचें काळेंपाणी हें राजकीय रुपांतर झालें, त्याप्रमाणेच आता व्यावहारिक रुपांतर होण्याचे वेळी आपले हातात जो शिक्षा देण्याचा अधिकार आहे तो घालवूं न देण्याविषयीं आपण जपलें पाहिजे व अशीच गोष्ट इतर राष्ट्रांतही घडून आली आहे. या बहिष्काराचें व्यावहारिक रूपांतर हल्लीं जो ऐर्लंडात दंगा चालला आहे त्यात दृष्टीस पडते. लॅडलीग म्हणून जी सभा आहे त्या सभेनें पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केलें आहे. तर अशाच त-हेनें जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचें रुपातर होईल तर त्यापसून पुष्कळ फायदा होईल. दारू पिणारास बहिष्कृत करावें आणि भांग, गांजा, अफू यथास्थित सुरू राखावी काय? अशा लोकासही कां बहिष्कृत करूं नये ? धर्माची सबब इतर सर्व बाबतींत जर इतकी जारीनें सुरू नाहीं तर येथे मात्र तिचा एवढा प्रभाव कां ? एकदां बहिष्कारास व्यावहारिक शिक्षेचें पुरें रुप मिळाल्यास त्यापसून आपणांस किती उपयोग करून घेतां येईल ? आज ज्या हजारों गोष्टी धर्माविरुद्ध नसतांही आपल्या नुकसानीस कारण होतात त्यांचा चांगला बंदोबस्त करितां येईल,व असें करणें म्हणजे फारसें कठीण आहेसें नाहीं. बहिष्कारास राजकीय रुप तर प्राप्त झालेंच; मग त्यास व्यावहारिक कां देऊं नये हें आम्हांस समजत नाहीं.