पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळकांचे केसरीतील लेख

एक भेद नाहीं. एक लोककृत व दुसरा राजकृत, एवढा यांत विशेष आहे. राजा ज्याप्रमाणें एखाद्यास हद्दपार करितो, त्याचप्रमाणें आपण धर्मविरुद्ध वर्तन करणारास बहिष्कृत करितों. तिकडे ज्याप्रमाणें दंड होतो, त्याचप्रमाणें इकडे प्रायश्र्चित्त घ्यावें लागतें. सारांश, एका देहांतशासनाखेरीज आपणांस राजाप्रमाणेंच शिक्षा करण्याचा सर्व अधिकार आहे. भेद इतकाच कीं एक व्यवहारपरीक्षक व दुसरा धर्मपरीक्षक.
 येथपर्यंत या शब्दाचे अर्थसंकोचाची व तदनुसार लोक व राजा यांच्या अधिकारविभागाची हकीकत झाली; आता यांच्या बलाबलाविषयीं थोडासा विचार करावयाचा. एका आंग्लभौम महापंडितानें असें लिहिलें आहे कीं, राजकीय शिक्षेपेक्षा लौकिक शिक्षेचे आपणांस भय जास्त असतें, व राजकीय शिक्षा लौकिक शिक्षेस अनुसरून नसल्यास तीपसून कधींही फायदा होणार नाही. फार काय, पण राजकीय शिक्षा लोकमतावरच अवलंबून असते. आपण जर उद्या तुरुंगात जाणे ही शिक्षा असें मानिले नाही, तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार? लोक आनंदानेच तुरुंगात जातील. याचा प्रत्यय घेण्यास फार लांब जावयास नको. गेल्या दुष्काळात तुरूंगात जाणे ही शिक्षा असें कित्येकास वाटले? आज सरकारनें पुनर्विवाह सशास्त्र आहे व त्यापासून झालेली संततिही विभागार्ह आहे असा कायदा केला आहे, तरी आजपर्यंत किती पुनर्विवाह झाले आहेत? राजाज्ञेचा प्रभाव लोकमतावर कधींच पडत नाहीं, व जोंपर्यंत कायदा व धर्म याचें एकमत आहे, तोपर्यंतच दोहोंत जीव आहे. हे परस्परविरूद्ध असले तर प्राबल्य धर्माचें म्हणजे आपलेकडे लौकिक शिक्षेचेंच असतें.
 वर बहिष्कार म्हणजे काय, व त्यास हल्लींचा अर्थ कशानें प्राप्त झाला, यांचे विवेचन केलें आहे; व तसेंच परकी लोकांचे राज्य या देशात झाल्यापासून पूर्वी जसा सर्व अपराधाचा अतर्भाव धर्मांत होत असे, तसा न होता धर्म व राजकीय प्रकरणें हीं निरनिराळीं होऊन धर्मसंबंधी अपराधाबद्दल प्रायश्चित्त किंवा बहिष्काररुपी लौकिक शिक्षेचा, आणि राजकीय अपराधाबद्दल दंड, कैद, काळेपाणी, फांशी वगैरे राजकीय शिक्षेचा कसा उपयोग होऊं लागला, व राजकीय शिक्षेपेक्षां लौकिक शिक्षेची किती मातबरी आहे हेंही पण सांगितले आहे. आतां हा जो लोकांचे हातांत येवढी जबर शिक्षा देण्याचा अधिकार आहे, त्याचा कोणत्या तऱ्हेने उपयोग करितां येईल याविषयीं विवेचन करावयाचें.

    जुन्या लोकांचे इतिहासावरून एक असा स्पष्ट सिद्धांत करितां येतो कीं, हल्ली जें शिक्षेचें त्रिविधत्व आढळतें हें पूर्वापार नव्ह्ते, तर कालेंकरून जसजशी सुधारणा होत चालली तसतसेच शिक्षेचे प्रकार होत गेले. फार प्राचीन काळी जेव्हां राजास सर्व अधिकार असत,तेव्हां असली कांहीं भानगड नव्ह्ती. आपल्याकडेही त्याचप्रमाणेंचे असे. शूद्रानें वेदपठन केलें असतां शिक्षा राजानेंच द्यावी. चोरासही त्यानेंच दंड करावा. असो; पण उत्तरोत्तर धर्माची सर्वव्यापकता जसजशी कमी होत गेली, तसतसा धर्माध्यक्षांचा अधिकारही काढून घ्यावा लागला,