पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बहिष्कार


होय. आपल्यांत धर्म व कायदा यांचें धर्मग्रंथांतून एकाच ठिकाणीँ विवेचन झाल्याकरणानें आपली अशी समजूत झाली आहे. धर्मशास्त्राचें कोंणतेंही पुस्तक घ्या. त्यात मौंजीबंधनादि संस्कारही यावयाचे, व त्यांचेबरोबर राजानीं प्रजेस कसे वागवावें हेंही पण सांगितलें असते. एकादशीचा उपास मोडल्यास प्रायश्र्चित्त, व चोरी केल्यास दंड हे एकाच ठिकाणीं गोंवले असतात. हल्लीं जसे लोकांच्या व राजाच्या हक्काचें फारखत घोऊन प्रत्येकाच्या हक्कांचें नियमन झालें आहे, तसा प्रकार पूर्वी नसून राजा म्हणजे देवाचा अंश, व प्रजा म्हणजे त्याचीं लेंकरें असें समजत असत. "स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतव:" हाच प्रकार पूर्वींचे ग्र्ंथांतून आढळतो व अद्यापिही सरकार आपलें मायबाप होय अशा त-हेचे उद्गार ऐकूं येतात ! अशा स्थितीत शिक्षेचें त्रिविधत्व कोणाच्याही मनात येणार नाही. खरेंच आहे; रामचंद्र राजासारखा राज्यकर्ता असल्यावर 'माग्नाचार्टा' किंवा 'हेबस कार्पस्' कशास पाहिजे. पण अशी स्थिति सदोदित कोठून असणार ? खुद्द रामचंद्रासही "ते हि नो दिवसा: गता:" असा अनुभव मिळाला, मग आपली काय कथा ?
 असो; तर ज्याप्रमाणें राज्यकर्त्यांत अंतर पडलें आहे, त्याचप्रमाणे पूर्वीचे राजनीतीतही फेरफार झाले पाहिजेच. "राजा कालस्य कारणम्". भाडून घेतल्याखेरीज आता कांहीएक मिळणार नाही. अशा वेळेस लौकिक व राजकीय कामाचा व शिक्षेचा निरनिराळा भेद होंणें अवश्य होय व तसें हल्ली होतही चालले आहे. आता परधर्मी लोक या देशावर राज्य करूं लागल्यापसून आमचे धर्मसंबंधी तंटे त्याजकडे जाण्याचा संभवच राहिला नाही, व अशाने जरी पेशवाईतील रामशास्त्रीबुवाप्रमाणेच आता कलेक्टर व जज्ज याचा अधिकार आहे, तथापि आपण अजून लग्न नोंदवीत नाही किंवा घटस्फोटांचे याज्ञिकत्व करण्यास जज्जसाहेबास निमंत्रणही करीत नाही ! सरकारास या कार्यात मुळींच बोलतां येत नसल्याकारणानें, त्यास ते आमच्याकडे ठेवणे भाग पडलें आहे, व त्या संबंधाने जे जे तंटे उपस्थित होतील त्याचा निकालही आपणच केला पाहिजे. व निकाल झाल्यावर तो अमलात आणण्यास शिक्षाही आपणच केली पाहिजे. यावरून एवढें ध्यानात येईल की पूर्वीचे राजे सधर्मी असल्याकारणानें धर्म व व्यवहार यासंबांधाने जो त्याजकडे अधिकार होता, तो परधर्मी राजे झाल्याबरोबर निराळा करावा लागला. व धर्मसंबंधी अधिकार व निर्णय लोकांकडे व इतर व्यवहारनिर्णय राजाकडे असा सहजच विभाग झाला. शिक्षेचाही प्रकार त्याचप्रमाणें होय. संस्कृत ग्रंथांत बहिष्कार शब्दाचा प्रयोग राजानें अपराध्यास नगराबाहेर घालविणें या अर्थीही केलेला आढळतो; पण आतां जेव्हां वर लिहिलेला अधिकारविभाग झाला,तेव्हा राजाने व्यावहरिक अपराधाबाबद केलेल्या बहिष्कारास "काळेपाणी" असे नूतन नाव मिळालें, व बहिष्कार शब्दाचा उपयोग धर्मप्रकरणीं होऊं लागला. वस्तुत: पाहता बहिष्कार व काळेपाणी यात काहीं