पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळकांचे केसारींतील लेख
कोंकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे

 कित्येक गोष्टी अशा आहेत की, त्या सर्वांस माहीत असतां व त्याची आवश्यकता प्रत्येक दिवशीं सर्वांच्या अनुभवास येत असता, त्याबद्दल कोणी कोणाशी बोलत नाही. याचें कारण असें आहे की, त्या गोष्टी पुरातन जनरूढीविरुद्ध आहेत. सर्व भयांमध्यें लोकापवादाचें भय मोठे प्रबल. यापुढें सुधारणेचा झेंडा लावणाऱ्या महावीरांच्या कंबरा बसतात. असे जरी आहे, तरी ज्या गोष्टींपासून सतत नुकसान होत आहे असें वाटतें, अशा, कोणीतरी (भीत भीत का होईना) लोकाच्या विचारापुढे आणिल्याच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण फार पुरातन आहेत याबद्दल कोणासही संशय येणार नाही. या चार वर्णांचा परस्परांशी अन्नोदकव्यवहार होत असे; इतकेच नाही, तर ब्राह्मणांनी क्षत्रिय कुलांतील मुली करणें सशास्त्र असल्याबद्दल ग्रंथातरी अनेक आधार सापडतील. तथापि प्रकृत प्रसंगी या प्रश्र्नाशीं आम्हास कांही एक करावयाचे नाही. याचा येथें स्फुट उल्लेख केला, याचें कारण इतकेंच की, ज्या वर्णाचा अलीकडे अन्न व्यवहार देखील बंद झाला, त्या वर्णांमध्ये पूर्वी विवाहसुद्धा होत असत. पण कालगत्या अनेक कारणानीं या चार वर्णांचा हरएक प्रकारचा संबंध अलीकडे तुटला, व तो न होण्याविषयीं निषेधपर वाक्ये धर्मशास्त्रात किंवा इतर ठिकाणीं सांपडतील. असो; झालें तें झाले. याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. पण देशस्थ, कोंकणस्थ व कऱ्हाडे यांच्यामध्यें अन्नव्यवहारादि सर्व गोष्टी चालू असतां विवाहनिषेध कसा झाला हा प्रश्र्न मोठा विचारार्ह आहे. या निषेधास कोठें शास्त्रांतरी आधार सांपडेल असे आम्हास वाटत नाहीं. कोणाच्या कोठें कांही पाहाण्यांत आला असल्यास त्यांनीं कृपा करून आम्हास कळवावा. कसेंही असो, हा निषेध दिवसेंदिवस फारच अहितकारक होत आहे ही गोष्ट कोणाही निःपक्षपाती विचारी मनुष्याच्या लक्षात आल्याखेरीज राहाणार नाही. देशस्थ आणि कऱ्हाडे याच्यांत कोठे कोठें लग्नें होतात, व त्यांबद्दल कोणी कोणास दोष देत नाही; असे असता देशस्थ, कोंकणस्थ


* (वर्ष १ अंक २-४)