साचून येतो. रविवार हा खंडोबाचा वार त्यामुळे दर रविवारी ती दोघं वाड्यावर येऊन मल्हारीची गाणी म्हणत. मल्हारीचं प्रेमप्रकरणही मोठ्या खुबीनं त्या गाण्यात ओवलेलं असायचं. जणू ती ही तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसंच.
जातं, तुणतुणं, डफ, डुंगरू, ढोलकी, घंटा, समई, कवड्याची माळ अशांमधूनही आपली लोकसंस्कृती आपलं नातं प्रस्थापित करत राहाते. कीर्तन, प्रवचनातून फिरवलं जाणारं आरतीचं ताट सुद्धा तुम्हा आम्हाशी काही नातं सांगून जातं. कर्पूरारतीवरून फिरवलेला हात माथ्यावरून फिरवताना होणारी अनुभूती शब्दातून सांगता येणारी नाही; पण ती आपली लोकसंस्कृती आहे, प्रथा आहे. हे सगळं जगण्याला बळ देणारं धन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मन जसं आश्वस्त होतं, तसंच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात डोकावताना ते प्रसन्न होतं. तुमच्या आमच्या दिग्गजानी, लेखक, कवींनी हे धन जपलं आहे. लिखित स्वरूपात साठवण्याचा प्रयत्न केला आहे.
मी या सर्वांकडे फक्त आस्वादक दृष्टीने पहाण्याचा प्रयत्न केला. या सर्व लेखांचा जन्म त्याच भावनेतून झाला आहे. हे लेख लिहिताना मला एक समाधानही मिळालं. त्या निमित्ताने संदर्भासाठी अनेक ग्रंथांचं वाचन घडलं.
डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. द. ता. भोसले, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. शिवाजीराव चव्हाण, डॉ. विश्वनाथ शिंदे वगैरे लेखकांनी लोकसंस्कृतीचा सखोल अभ्यास करून विपुल ग्रंथलेखन केले अहे. त्या ग्रंथांचा उपयोग संदर्भासाठी झाला. माझे लहानपण खेड्यात गेल्याने तिथं प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या ग्राम्य संस्कृतीचाही उपयोग हे लेख लिहिताना झाला.
माझ्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी हे लेख वाचून या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली. त्यातून या लेखकाकडे पाहण्याची, वाचण्याची वाचकांची एक दृष्टी तयार झाली.
माझे मित्र व दै. 'ऐक्य'चे उपसंपादक श्री. वासुदेवराव कुलकर्णी व श्री. मधुसुदन पतकी यांच्यामुळे दै. 'ऐक्य'च्या साप्ताहिक झुंबर पुरवणीतून ही लेखमाला वाचकांसमोर आली. सातारा आकाशवाणीचे श्री. सचिन प्रभुणे यांचीही लेखमालेसाठी मदत झाली.
ही लेखमाला प्रकाशित होताना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद हा मनाला आनंद देणारा होता. काही कॉलेजमधून या लेखांचा संग्रहही करण्यात आला. हे सगळं विलक्षण सुखावणारं व प्रेरणा देणारं ठरलं.
आमचे मित्र श्री. विश्वास दांडेकर, श्री. अभिराम भडकमकर, डॉ. यशवंत पाटणे, अरुणराव गोडबोले, श्री. मधू नेने, प्रा. श्रीधर साळुखे, प्रा. एम. बी. भोसले, कै. दत्ता मारुलकर, डॉ. सौ.