चुका परखडपणे सांगणारी रोखठोक वाणी आहे. हे सांगताना आमच्या आयामाया भगिनींना कोणती भीती वाटत नाही. प्रत्यक्ष प्रभूरामाच्या चुकासुद्धा सीतामाईची बाजू घेऊन त्या दाखवू शकतात. त्या वेळी जाणवतं नारी ही अबला कधीच नव्हती, एक सुप्त शक्ती तिच्यात प्रथमपासून आहे. पोवाडा घ्या, अभंग घ्या, किती प्रकार या गाभाऱ्यात विसावले आहेत. ओंजळी भरभरून ही संपत्ती लुटायची म्हटली तरी ही संपणार नाही. वेगळ्या अर्थाने माणूस समृद्ध होत जाईल, हे मात्र नक्की.
चातुर्मासात रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर त्या-त्या दिवशीची कहाणी आई किंवा आजी सांगायची. कधी वाचायची. लहानपणी आपण सर्वही मोठ्या भक्तिभावाने अशा कहाण्या ऐकायचो, त्यात रमून जायचो. त्यातले राजाराणी त्यांचं राज्य त्यांना मिळालेले, शाप ही सगळं चित्रच जणू. मग डोळ्यांसमोर उभं रहायचं. ते वयही गोष्टी वेल्हाळ असतं. ते सगळं खरं खरं वाटतं. वाईट वागलं तर वाईट घडतं. देव शिक्षा देतो. यातून मग चांगलं वागायची शिकवण मनावर आपसुक ठसली जायची. जणू तो वसा त्या कहाण्यातून मिळून जायचा. या कहाण्यासुद्धा लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातील एक मौल्यवान ऐवजच आहेत.
आम्ही खेड्यात असताना जुन्या जाणत्या स्त्रियांकडून अनेक लोकगीतं ऐकलेली आहेत. बऱ्याचवेळा या बायका त्यांची वैयक्तिक दुःख गाण्यात ओवायच्या. कदाचित अशा प्रकारच्या प्रकटनामुळं त्यांचं ते दु:ख हलकं होत असेलही. जगण्यात असणाऱ्या अनेक नात्यांचं वर्णन त्यात यायचं. नवरा, भाऊ, मैत्रीण, आई, सासू, कोणतं नातं त्यातून सुटायचं नाही. त्या गायला लागल्या, की तो त्यांचा जणू छंदच बनायचा. सादाला प्रतिसाद मिळाल्याप्रमाणे एकीनंतर दुसरी गायला लागायची. हा सगळा त्यांच्या प्रसन्न हृदयाचा एक आविष्कारच असायचा. असं म्हटलं जातं, की ओवी नुसती ऐकायची नसते तर ती गायची सुद्धा असते. या सगळ्या लोकगीतांमधल्या ओव्यांच्याकडे पाहिलं, की जाणवतं संगीतातले सगळे प्रकार जणू यात सामावलेत. सगळे राग आळवले गेलेत. एक अत्यंत सुंदर नादब्रह्मच या ओव्यांनी निर्माण केलेय. लोकगीतं हा ग्रामीण स्त्रियांच्या सुखदुःख प्रकटीकरणातून निर्माण झालेला मनोहारी छंद आहे, म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वाघ्या-मुरळी हा प्रकार आता कमी झालाय. खेडोपाड्यात अजुनी मुरळी दिसते. खंडोबाची मल्हारीची गाणी गाते. भंडारा उधळीत हातातली घंटी वाजवत गिरक्या घेत नाचताना मध्येच बसकण घेत वाघ्याबरोबर ताल धरते. खेड्यात रविवारी वाघ्या-मुरळी आमच्या वाड्याच्या चौकात येत. कपाळाला भंडारा लावलेला वाघ्या आणि त्याच्याबरोबर गर्द रंगाचं लुगडं नेसलेली मुरळी अजुनी लख्ख आठवते. त्यांनी त्या वेळी उधळलेल्या भंडाऱ्याचा पिवळट गंध नाकाशी