पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (धोरले) नगर वाचनालय, सातारा.

गाभाऱ्यात प्रवेश करताना

 खजिना हा फक्त सोनं नाणं संपत्ती याचाच असतो असं नव्हे. त्यापेक्षाही खूप काही मौल्यवान असं असू शकतं. ते माणसानं प्राणापलीकडे जपावं लागतं. आपली लोकसंस्कृती हाही असाच मौल्यवान ठेवा आहे. मागं वळून पाहिलं, की लक्षात येतं या लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातही अमाप संपत्ती आहे. ही कोणा एकाची मालकी नक्कीच नाही. तो आपल्या सर्वांचा दस्तऐवज आहे.
 हा लोकसंस्कृतीचा गाभारा कुबेराला लाजवील असा आहे आणि चिरंजीवही आहे. काय नाही यात! आया-मायांनी गायिलेल्या ओव्या आहेत. ज्यात त्यांच्या जगण्याचं, सुख दुःखाचं प्रतिबिंब आहे. नातेसंबंधाविषयीच गुज आहे. सणांची वर्णनं आहेत. हे सण कुठे कसे साजरे होतात, त्यात तिथल्या लोकजीवनाचा कसा सहभाग आहे, सणांच्या वेळी कोणते विधी असतात, कोणती गाणी म्हटली जातात. या सगळ्याची नोंद यातून सामोरी येते. मराठमोळा माणूस जितका भाबडा तितकाच भाविकही. त्याची वेगवेगळ्या ठिकाणी असणारी कुलदैवते. खंडोबा, ज्योतिबा, महालक्ष्मी कितीतरी ठिकाणची देवस्थानं. त्यांचे रीतीरिवाज पूजाअर्चा, गाणी, गोंधळ यातून प्रतीत आणि व्यक्त होणारी भक्तिभावना याच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात सामावलेली आहे. लावणी तर मराठी मनाची राणी. तिला तिची खास परंपरा. कितीतरी असामान्य लोकांनी शाहिरीच्या भक्तार माध्यमातून या लावणीला जिवंत ठेवली. शृंगराच्या तालावर ही लावणी त्या त्या कालाचं प्रतिबिंब साजरूपाने लेवून जिवंत राहिली. कित्येक लोककथा यांच्याकडून त्याच्याकडे अशा रूपानं - वर्षानुवर्षे चालत राहिल्या. कोणीतरी मग लिहिले. त्या याच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात सामावल्या गेल्या. याचा कोणी एक नक्की लेखक नाही. कथन करणारे आणि ऐकणारे मात्र अनेक आहेत; पण यासुद्धा आमच्या संस्कृतीचा एका अनमोल ठेवा आहेत.

 या लग्नाच्या वेळी घेतले जाणारे अनेक उखाणेसुद्धा मोठे रंजक तर असतातच; पण त्यात सुद्धा त्या-त्या काळातल्या जनसमाजाची छबी दिसून येते.

 देवदैवतांचे मानुषीकरण करून त्या सर्वांना जनसामान्यांच्या भावनेतून विचार करायला ... लावण्याची ताकद आमच्या माय भगिनीमध्ये होती. जात्यावर बसल्यावर जात्याच्याबरोबर गरगरत त्यांची प्रतिभा फुलत होती. महाभारत, रामायण यासारख्या ग्रंथावर अनेक जाणकार समीक्षकांनी टीका-टिपण्या केल्या. त्यात घडणाऱ्या घटनांवर, व्यक्तींवर या जाणकारांनी त्यांची सुज्ञ मते नोंदवली; पण त्याही पलीकडे जाऊन पहाण्याची नजर या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये सापडते. इथे मग कोणी मोठा-कोणी लहान नाही. देव असला तरी एकदा मानवी रूप घेतले, की त्याच्या