पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

लावणी

 बऱ्याच वर्षांपासून मराठी माणूस व लावणी यांचं जिवाभावाचं नातं आहे. लावणी ही मराठी माणसाच्या काळजाचा तुकडा आहे म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही. ढोलकीचा तोडा कानावर पडल्यावर मऱ्हाठी माणूस क्षणात उत्तेजित होऊन ताजातवाना होतो. त्याच्या मनपावलांना लावणाचा आढ लागून राहते. म्हणूनच वेगळ्या अर्थानं लावणी ही मराठी मनाची राणी समजली जाते.

 कितीतरी वर्षे लावणीनं मराठी मनावर राज्य केलं आहे आणि अजूनही करते आहे. अशा लावणीच कूळ शोधणं वा उगम शोधणं हा ऋषीचं कूळ शोधण्याचा प्रकार होईल; पण फार पूर्वीपासून लावणी लिहिली गेली आहे. मन्मथ शिवलिंग यांनी लावणी लिहिलेली आढळली आहे आणि मन्मथ शिवलिंग यांचा जन्म इ. स. १५६० चा व मृत्यू इ. स. १६१३ म्हणजे त्या काळापासून लावणी सापडते; पण हे जरी असलं तरी लावणीला भरभराट लाभली ती उत्तर पेशवाईच्या काळात त्या काळात खऱ्या अर्थानं लावणीला राजाश्रय मिळाला. लावणी महाराष्ट्राच्या सर्व भागांत निर्माण होत होती. जत्रा किंवा उत्सवाच्या काळात गावोगावी लावणीचे फड उभे राहात. लोक उत्साहानं लावणी ऐकण्यासाठी गर्दी करत. सातारा, कोल्हापूर, बालेघाट, संगमनेर, मराठवाडा, तुळजापूर, मुंबई वगैरे भागांत लावणीची निर्मिती झालेली आढळून येते.

 या लावणीच्या रचना पाहता लक्षात येतं, की लावणी रचना करणारे शाहीर हे तसे सर्वसामान्य जनसमुदायातील होते. त्याचमुळे लावणीची रचना सर्वसामान्य जनसमुदायाच्या मनोरंजनासाठी व उद्बोधनासाठी केली जात होती. बऱ्याच वेळा लावणी ही अश्लील वा बीभत्स असते असा समज दिसतो; पण तो सर्वार्थानं खरा नाही.

 आत्तापर्यंतच्या लावणीकडे पाहिलं, की लक्षात येतं लावणीमध्ये त्या त्या लावणीकारांच्या काळातील समाजजीवन, रीतिरिवाज, भाषा, लकबी या सर्वांचा समावेश आहे. त्यावेळची जीवनपद्धती त्या काळातल्या लावण्यातून सामोरी येते. त्या मागचा आशय हा मराठी मातीतून जन्माला आलेला आणि अस्सल आहे, हे मात्र नक्की.

 लावणी म्हटलं की सर्वसामान्यपणे तमाशात म्हणली जाणारी शृंगारिक, नृत्य, गान, नाट्ययुक्त लावणीरचना असाच अर्थ घेतला जातो. लावणीच्या उपलब्ध स्वरूपावरून तसा अर्थ घेतला असावा; पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तमाशाचे जे फड उभे राहतात. त्यांचे निरीक्षण केल्यास आणि लावणीच्या सादरीकरणाचे स्वरूप पाहिल्यास लावणी सर्वथैव शृंगारिक असते आणि नृत्यलोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३५ ॥