पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा जन्माचे सौभाग्य सासूकडून मागितले जाते. अनेक नातेबंधाचे वस्त्र जपणारी स्त्री तिच्या सगळ्या भावभावना जात्यावरच्या ओवीत कित्येक वर्षे गुंफत आली आहे. कालचक्राबरोबर इतकी वर्षे जणू हे दगडाचे जातेही घरघर फिरत आले आहे; पण स्त्री नमतं घेते, सावरून घेते ते संसारासाठी पोराबाळांसाठी; पण याचा अर्थ ती दुबळी मुळीच नाही. वेळ प्रसंगाला तोंड देण्याची तिच्या ठिकाणी ताकद आहे. कोणी वेडंवाकडं बोललं, तर धमकावण्याची तिच्या ठिकाणी ताकद आहे.

थोराच्या आम्ही लेकी, आम्ही फार शिरजोर
सर्पाचे केले दोर, वाघ नेले पाण्यावर
बोलशील बोल, बोलू देते एक दोन
तिसऱ्या बोलाला, उतरीन भारीपण

 असं आगळंवेगळं धारिष्ट्यही तिच्या ठिकाणी आहे. प्रसंगी ती दुर्गा, कालीमाता बनू शकते याची जाणीवही या ओव्यातून मिळते; पण ही दुर्लभ प्रतिभा सरस्वतीनं या अशिक्षित स्त्रियांना बहाल केली आहे. दळण दळणं ही सुद्धा एक कला आहे. लहान-लहान घास घातले, तर जातं नीट ओढता येत नाही. ते जड जाते म्हणून त्याला एकसारखा घास घालावा लागतो

जात्याला वैरण गं  घालू नये लई थोडी
कष्टी होतो ईसवर  मूठ घ्यावी एक जोडी

 इथं ती धान्याच्या घासाला वैरण म्हणते, तर जात्याला ईश्वर म्हणते या दोन्ही शेतकऱ्याच्या घरातल्या सुंदर अशा कल्पना आहेत. हे दळण दळून झाल्याचंही एक वेगळं समाधान असतं.

सरीलं दळायानू  सूप सारीते पलीकडं
सासरी म्हायेरी  राज मागीते दहीकडं
सरीलं दळायानून  पदर मी घेते डोई
आऊक्षाची ओवी  तुला गाते बयाबाई
सरीलं दळायानू  निघळनं चंदनाचं
हळदीवर कुंकू  मार माज जडीव कोंदनाचं
सरीलं दळायानू  माज्या सोन्याच्या हातानं
लाडक्या बाळराजा  भाग्यवंताच्या जात्यानं

 दळण संपलेलं सूप बाजूला सारताना सासर-माहेर दोन्हीकडचं राज्य ही स्त्री मागते. याचा अर्थ दोन्ही घरी संपत्ती, सुबत्ता, समाधान राहावं अशी तिची इच्छा आहे आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे घामानं वल्लाकिच्च झालेला पदर डोक्यावरून घेताना ती आपल्या आईला आयुष्य मागते. बरंच दळण दळण्यानं ती घामाघूम झाली आहे. घामाचे ओघळ कपाळावरून निथळत आहेत. तो कपाळावरचालोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३२ ॥