या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मायबाप माजी बाई सर्व तीर्थांचा आगर
वपी मी गाते काशीतल्या काशिनाथा
रामचंदर माजा पिता सीता रानी माजी माता
आईवडिलांची सावली जण माज्यावर असणारी देवाधिकांची सावली आहे. आई-वडील हच माझं तीर्थ आहे. या श्रद्धेतून अशी ओवी येत राहते.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगलं सासर बघून दिलं म्हणून सुख आपल्या दारी आल याची तिला जाणीव आहे. ते सांगताना ती म्हणते-
जागा बगुनी दिल्या पागा वतन बगुनी दिल्या लेकी
पित्या माज्या दौलताला शाना चातुर म्हनू किती
इतरही नात्यांचा मागोवा जात्यावरच्या ओवीमधून येत राहतो.
नदीच्या पल्याड गं काडी हालती लव्हाळ्याची
तयार तितं माजी हैती बाई मामा मावशी जिव्हाळ्याची
हिरव्या चोळीवरी कुणी काढिली गवळण
ह्या ग नारीला सांगू किती हाय हौसची मावळण
उचकी लागीयिली का गं उचकी तुजी गाई
मायेच्या मावशीनं सई काडीली कशापाई
स्त्रीच्या विशेष आवडी निवडी दर्शवणारा हा भावनाविष्कार मोठा आकर्षक आहे. मावशी, आत्या, मामा ही माहेरकडची नाती एक खासा ओलावा देणारी असतात.
स्त्रीच्या आयुष्यात आईचं नातं जितकं महत्त्वाचं तितकच वेगळ्या रीतीनं सासूचंही. सासूबरोबर आईपेक्षा जास्त आयुष्याचा कालावधी काढावा लागतो. मग सासूवरची ओवी जात्यावर न गायली तर नवल
सासू आत्याबाई हात जोडीते तुम्हाला
दिवाळीचं मूळ नका परतवू रामाला
सासू आत्याबाई हात जोडीते बसुनी
दिवाळीचं मूळ राम चालले रूसुनी
सासू आत्याबाई सोनियाच्या तुमच्या निऱ्या
जलमाला जावो आमच्या कुंकवाच्या चिऱ्या
सासू आत्याबाई सोनियाचे तुमचे गोट
जलमाला जावो आमचे कुंकवाचे बोट
लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३१ ॥